उरण: पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने उरण नगरपरिषदेने आपल्या कार्यक्षेत्रात मान्सूनपूर्व कामांना युद्धपातळीवर सुरूवात केली आहे. शहरात पुराला कारणीभूत ठरणारे मुख्य नाले आणि गटारांची साफसफाई सध्या वेगाने सुरू असून, आतापर्यंत जवळजवळ 50 टक्के कामे पूर्ण झाली आहेत.
येत्या 5 ते 6 दिवसांत ही कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या थेट निगराणीखाली ही सर्व मोहीम राबवली जात आहे.
उरण नगरपरिषद हद्दीत मोरा, भवरा आणि बोरी या भागांचा समावेश होतो. हा परिसर डोंगराच्या कडेला वसलेला असल्याने डोंगरावरून लहान-लहान नाले वाहतात, मात्र बाजूलाच समुद्र असल्याने हे पाणी लगेच वाहून जाते.
परंतु, उरण शहरातून वाहणारा मुख्य दादर नाला हा नगरपरिषदेसाठी मोठा आव्हानाचा भाग ठरतो. द्रोणागिरी डोंगरावरून सुरू होऊन डाऊरनगर मार्गे हा नाला उरण शहरातून समुद्राला मिळतो.
सुरूवातीच्या पावसात डोंगरावरील पालापाचोळा आणि कचरा या नाल्यात वाहून येत असल्याने नाला तुंबतो व शहरात पाणी साचते. उरण हद्दीत या मुख्य दादर नाल्यासह इतर 20 ते 22 छोटे नाले आहेत.
गतवर्षीच्या पावसाळ्यात उरणमधील न्यायालय (कोर्ट) आणि इंदिरा गांधी हॉस्पिटल या सखल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. यावर्षी अशा संवेदनशील ठिकाणी पाणी साठू नये, यासाठी नगरपरिषदेतर्फे विशेष काळजी घेतली जात आहे.
उरण शहरातील ज्या भागात जेसीबी मशीन जाऊ शकत नाही, अशा अरुंद ठिकाणी मनुष्यबळाचा (सफाई कामगारांचा) वापर करून गटारे आणि नाले साफ केले जात आहेत. यासोबतच पावसाळ्यात दुर्घटना टाळण्यासाठी शहरातील धोकादायक झाडे आणि त्यांच्या फांद्या छाटण्याचे कामही पालिकेने हाती घेतले आहे.
नाले सफाई सुरू असली तरी उरण पालिकेसमोर काही तांत्रिक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत, उरण शहरातील पाण्याचा निचरा ज्या भागातून समुद्रात होतो, त्या जागा खासगी मालकीच्या आहेत. तेथे पाण्याचा निचरा होण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने आणि खासगी जागा मालक पाण्याचा मार्ग मोकळा करण्यास परवानगी देत नसल्याने पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होते.
उरण शहरातून शेजारील काही ग्रामपंचायतींचे नाले वाहतात. मात्र, या ग्रामपंचायतींकडून वेळेवर नाले सफाई होत नाही. परिणामी, तिथला सर्व कचरा उरण नगरपरिषदेच्या नाल्यांमध्ये येऊन पडतो आणि मुख्य नाले तुंबतात. त्यामुळे या संबंधित ग्रामपंचायतींनीही वेळेवर सफाई करणे गरजेचे बनले आहे.
“उरण शहरातील प्रमुख नाले आणि गटारांची साफसफाई वेगाने सुरू आहे. आजपर्यंत 50 टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या 10 जूनपूर्वी सर्व नाल्यांची व गटारांची स्वच्छता शंभर टक्के पूर्ण केली जाईल. सखल भागात पाणी साचू नये म्हणून आम्ही विशेष दक्षता घेत आहोत. तसेच, मान्सूनमध्ये उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी संबंधित सर्व विभागांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.“- हरीष तेजी, आरोग्य आणि स्वच्छता अधिकारी, उरण नगरपरिषद