Bribery Case Pudhari
रायगड

Uran Mahavitaran Bribe Case: महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ लाच घेताना रंगेहाथ अटक

उरणच्या बोकडवीरा येथील महावितरण कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञाला थकीत वीजबिल भरल्यानंतर काढलेले वीजमीटर पुन्हा बसवण्यासाठी १८ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने पकडले.

पुढारी वृत्तसेवा

उरण: थकबाकीचे वीजबिल भरल्यानंतरही काढलेले वीजमीटर पुन्हा बसवून देण्यासाठी १८ हजार रुपयांची लाच घेताना महावितरणच्या एका वरिष्ठ तंत्रज्ञाला (वायरमन) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले.

बोकडवीरा-उरण येथील महावितरण कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ रामेश्वर निवृत्ती घनमोडे असे लाचखोर लोकसेवकाचे नाव असून, त्याच्याविरोधात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराने व्यवसायासाठी महावितरण कंपनीकडून वीजमीटर घेतले होते. मात्र, वीजबिल न भरल्यामुळे महावितरणने वीजपुरवठा खंडित करून तो मीटर काढून नेला होता. त्यानंतर तक्रारदाराच्या काकी आनंदीबाई ठाकूर यांनी बिल भरणा करून मीटर पुन्हा बसवून घेण्याच्या कामासाठी तक्रारदाराला अधिकारपत्र दिले होते.

तक्रारदाराने थकबाकीचे बिल भरल्यानंतर काढून नेलेले मीटर पुन्हा बसवण्यासाठी वायरमन रामेश्वर घनमोडे याने शासकीय फी व्यतिरिक्त २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. अखेर तडजोडीअंती १८ हजार रुपये देण्याचे ठरले.

या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीची खातरजमा केल्या नंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी उरण येथे सापळा रचून लाचेची १८ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना रामेश्वर घनमोडे याला रंगेहात पकडले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT