राजकुमार भगत
उरण: उरण आणि परिसराला जोडणाऱ्या महत्त्वाच्या खोपटा पुलाच्या दुरुस्तीचे काम प्रशासकीय दिरंगाई आणि तांत्रिक कारणांमुळे लांबणीवर पडले आहे. याचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
गेल्या चार महिन्यांत पुलाचे केवळ 20 टक्केच काम पूर्ण झाले असल्याने, जूनपर्यंत हे काम पूर्ण होण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पर्यायी नवीन पुलावर होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
आयआयटी, पुणे यांच्याकडून करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये जुन्या खोपटा पुलात अनेक गंभीर दोष आढळून आले आहेत. यापूर्वी पुलाच्या दुरुस्तीसाठी 5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते, मात्र आता वाढीव दुरुस्तीसाठी आणखी 4 कोटी रुपयांच्या निधीची गरज भासणार आहे.
तसा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे पाठवला आहे. सध्या पुलाच्या वेल दुरुस्तीचे काम सुरू असून बेअरिंग बदलण्याचे काम अद्याप बाकी आहे. बेअरिंग बनवण्यासाठी वेळ लागणार असल्याने या पुलावरून वाहतूक सुरू करण्यास मोठा विलंब होत आहे.
जुन्या पुलाची दुरुस्ती सुरू असल्याने सर्व वाहतूक नवीन खोपटा पुलावरून वळवण्यात आली आहे. मात्र, या पुलावर रोज होणाऱ्या कोंडीमुळे प्रवाशी, विद्यार्थी आणि रुग्ण तासनतास अडकून पडत आहेत.
चार दिवसांपूर्वी या कोंडीत एक गरोदर महिला अडकून पडली होती. रुग्णवाहिकेला रस्ता न मिळाल्याने आणि महिलेच्या पोटातील बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने, अखेर तिला दुचाकीवरून दवाखान्यात पोहोचवण्याची नामुष्की आली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गेल्या 9-10 वर्षांपासून मोफत रुग्णवाहिका चालवून रुग्णांची सेवा करणारे समीर पाटील यांनी येथील परिस्थितीचे गंभीर स्वरूप मांडले आहे. पाटील म्हणाले की, ‘खोपटा-कोप्रोली मार्ग आणि पुलाच्या कामामुळे दररोज या ठिकाणी प्रचंड वाहतूककोंडी होत आहे.
अनेकदा रुग्णवाहिका या कोंडीत अडकून पडते, ज्यामुळे रुग्णांचा जीव टांगणीला लागतो. रुग्णवाहिकेला रस्ताच मिळत नसल्याने, अनेक गंभीर रुग्णांना रुग्णवाहिकेतून उतरवून अक्षरशः दुचाकीवरून कोप्रोली येथील रुग्णालयात पोहोचवावे लागले आहे. प्रशासनाने या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने उपाययोजना करावी.’
सध्या एस.एस. शेठ या कंपनीमार्फत दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र, कामाचा संथ वेग पाहता पावसाळ्यापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार का? आणि रोजच्या या ट्रॅफिक जॅममधून नागरिकांची सुटका कधी होणार? असा सवाल आता उरणची जनता विचारत आहे.
कोंडीची मुख्य कारणे
अरुंद रस्ता : नवीन पुलावरून एकावेळी दोन्ही बाजूने फक्त
एक-एकच वाहन जाऊ शकते.
नियोजन शून्य : एखादे अवजड वाहन बंद पडल्यास ते हटवण्यासाठी
कोणतीही क्रेन किंवा यंत्रणा तैनात नाही.
पोलिसांचा अभाव : वाहतूक सुरळीत करण्यासाठी येथे एकही
वाहतूक पोलीस किंवा वॉर्डन उपस्थित नसतो.
काँक्रीटीकरण : रस्त्याच्या सुरू असलेल्या काँक्रीटीकरणामुळे
आधीच ठिकठिकाणी रस्ते अरुंद झाले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जुन्या पुलाचे
काम पूर्ण झाल्यानंतर दिवाळीनंतर नवीन पुलाच्या दुरुस्तीचे काम
हाती घेतले जाणार आहे. ऐन सणासुदीच्या काळात उरणकरांना पुन्हा
एकदा भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.
पुलाची बेअरिंग बनवण्यास वेळ लागत आहे. 4 कोटींच्या वाढीव निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.- सार्वजनिक बांधकाम विभाग, उरण