उरणमध्ये बेसुमार, अनधिकृत कंटेनर यार्ड pudhari photo
रायगड

Uran illegal container yard : उरणमध्ये बेसुमार, अनधिकृत कंटेनर यार्ड

निसर्गरम्य उरण तालुका संकटात; उरणकरांची डोकेदुखी वाढली; विकासाच्या नावाखाली स्थानिकांची परवड

पुढारी वृत्तसेवा

उरण : राजकुमार भगत

कधीकाळी निसर्गाच्या कुशीत विसावलेला उरण तालुका आज कंटेनरच्या विळख्यात अडकला आहे! सिडकोचे भूसंपादन आणि जेएनपीटी बंदराच्या उदयानंतर तालुक्याचे रूपडे पूर्णपणे पालटले आहे.

एकेकाळी हिरवीगार शेती, पांढरीशुभ्र मिठागरे आणि निळाशार समुद्र अशी ओळख असलेला उरण तालुका आता केवळ अवजड कंटेनर, धुळीचे साम्राज्य आणि वाहतूक कोंडीचे केंद्र बनला आहे. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा आणि स्थानिकांच्या जगण्याचा बळी दिला जात असल्याची संतप्त भावना सध्या उरणकरांमध्ये आहे.

उरण तालुक्यात आजघडीला सुमारे 40 सीएफएस आणि शेकडो अनधिकृत कंटेनर यार्ड व गोदामे आहेत. या गोदामांमुळे तालुक्याला गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कंटेनर यार्डांमध्ये पार्किंगची सोय नसल्याने हजारो अवजड वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना शेकडो अपघात होत असून हजारो उरणकर तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यार्ड उभारणीसाठी डोंगर पोखरले गेले, सुपीक जमिनी नष्ट झाल्या.

पारंपारिक नैसर्गिक नाले बुजवल्यामुळे पावसाळ्यात अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरते. दुर्गम भागात वसलेल्या अनेक अनधिकृत यार्डांची माहिती प्रशासनाकडे नाही. तेथे नेमका कोणता माल येतो आणि जातो, याचा कोणताही हिशोब नसल्याने हे यार्ड संशयाच्या भोवऱ्यात आहेत. सुरक्षेअभावी आगीच्या घटनाही वारंवार घडत आहेत.

वेश्वी, दिघोडे, चिर्ले, जासई परिसरात सिडको आणि वनविभागाच्या जमिनींवर अतिक्रमणे करून हे यार्ड उभारले गेले आहेत. अनेक गोदामांकडे ना ग्रामपंचायतीची परवानगी आहे, ना ते कर भरतात! तरीही त्यांना कस्टम्स, शासनाची परवानगी कशी मिळते? हा मोठा संशोधनाचा विषय आहे.

  • कंटेनर यार्डांमुळे स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला आहे, हे नाकारता येत नाही. परंतु, विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा आणि मानवी जीवांचा बळी देणे कितपत योग्य आहे? असंतुलित विकास तालुक्यासाठी आत्मघातकी ठरत आहे.प्रशासनाने तातडीच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. तालुक्यातील सर्व गोदामांचे तातडीने सर्वेक्षण करून त्यांची अधिकृत नोंद करावी. प्रत्येक यार्ड मालकाला स्वतःच्या जागेत पार्किंगची सोय करणे सक्तीचे करावे. रस्त्यावरील बेशिस्त पार्किंगवर कठोर कारवाई व्हावी.यार्डाच्या परिसरात वृक्षारोपण करणे आणि पाण्याचा निचरा होण्याची योग्य व्यवस्था करणे बंधनकारक करावे.उरणचा विकास हवा आहे, पण तो स्थानिकांच्या जीवावर उठणारा नसावा! प्रशासनाने वेळीच डोळे उघडून कारवाई न केल्यास उरणकरांचा रोष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT