उरण: पावसाळ्यात खवळलेला समुद्र आणि माशांचा प्रजनन काळ लक्षात घेता, शासनाने १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारीवर वार्षिक बंदी घातली आहे. या बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि किनारपट्टीच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी उरणमध्ये पोलीस प्रशासन आणि मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उपस्थित मच्छिमार बांधवांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे.
सागरी मार्गाचा वापर देशविरोधी किंवा दहशतवादी कारवायांसाठी होऊ नये, यासाठी मच्छिमार हे प्रशासनासाठी 'समुद्राचे डोळे' म्हणून काम करतात. त्यांच्या सक्रिय सहकार्यानेच किनारपट्टी सुरक्षित ठेवण्यावर प्रशासनाचा मुख्य भर असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
बैठकीत मच्छिमारांच्या विविध अडीअडचणी व समस्या जाणून घेऊन त्या जागेवरच निकाली काढण्यात आल्या. माहे जूनमध्ये बोटी बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या मच्छिमारांनी यापुढेही असेच सहकार्य करत राहू, असा शब्द प्रशासनाला दिला.
या महत्त्वपूर्ण बैठकीला उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलाणी स्वतः उपस्थित होते. त्यांच्यासोबत सागरी सुरक्षा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काणे, मोरा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जयराम पाटील तसेच सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी सुरेश बावूलगावे उपस्थित होते.
मच्छिमारांच्या वतीने करंजा मच्छिमार सोसायटीचे अध्यक्ष प्रदिप नाखवा यांच्यासह इतर मच्छिमार सोसायट्यांचे पदाधिकारी आणि अंदाजे १२५ ते १५० मच्छिमार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागील तीन वर्षांत बंदीच्या काळात ज्या बोटींवर नियमभंग केल्याप्रकरणी गुन्हे (केसेस) दाखल करण्यात आले होते, त्यांचीच ही यादी असून ती पोलिसांना देण्यात आली आहे. या काळात बेकायदेशीर मासेमारी रोखण्यासाठी भारतीय कोस्टगार्डच्या ६ नौका समुद्रात गस्त घालत आहेत.
तसेच जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनही या संपूर्ण प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवून आहे, अशी माहिती परवाना अधिकारी सुरेश बाबुलगावे यांनी दिली.
उरण पोलिसांकडे ७० बोटींची यादी सुपूर्द
या बैठकीदरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उरणचे सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तथा परवाना अधिकारी सुरेश बावूलगावे यांनी उरण पोलिसांकडे अशा ७० बोटींची यादी सुपूर्द केली आहे, ज्या बंदीकाळातही समुद्रात मासेमारीसाठी जाण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.