Uran Fake Notes Pudhari
रायगड

Uran Fake Notes: उरणमध्ये २५ हजारांच्या बनावट नोटा जप्त; कॅनरा बँकेत ५०० रुपयांच्या ५० नोटा आढळल्या

उरणच्या धुतूम येथील कॅनरा बँकेत जमा करण्यासाठी आणलेल्या ५०० रुपयांच्या ५० बनावट नोटा आढळल्या. २५ हजारांच्या नोटांप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

पुढारी वृत्तसेवा

राजकुमार भगत

उरण: उरण येथील कॅनरा बँकेच्या धुतूम शाखेत ५०० रुपयांच्या बनावट नोटा भरण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बँकेत जमा करण्यासाठी आणलेल्या नोटांमध्ये २५ हजार रुपये मुल्याच्या एकूण ५० बनावट नोटा आढळल्याने या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात खरेदीची लगबग सुरू असतानाच या बनावट नोटा सापडल्याने संपूर्ण उरण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, ३ सप्टेंबर रोजी अनिकेत दशरथ ठाकूर (रा. बोरखार, ता. उरण) हे कॅनरा बँकेच्या धुतूम शाखेत स्वतःच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यासाठी आले होते.

त्यावेळी कॅशियर राहुल वर्मा यांनी नोटा मोजण्याच्या मशीनद्वारे तपासणी केली असता, ५०० रुपये दराच्या ५० नोटा बनावट आणि खोट्या असल्याचे निदर्शनास आले. बँकेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ या संशयास्पद नोटा ताब्यात घेतल्या.

बँकेच्या धुतूम शाखेच्या व्यवस्थापक सपना रघुनाथ बोरसे यांनी या घटनेबाबत ५ सप्टेंबर रोजी उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून उरण पोलिसांनी अनिकेत दशरथ ठाकूर याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, २५ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

दरम्यान, पोलिसांच्या तपासात अनिकेत ठाकूर यांनी माहिती दिली की, त्यांचे एक बँड पथक आहे आणि ते जुई येथे एका लग्नसमारंभात बँड वाजवण्यासाठी गेले होते.

तेथे त्यांना बिदागी (कामाचा मोबदला) म्हणून हे पैसे मिळाले होते. मात्र, लग्नाच्या आयोजकांना या बनावट नोटा कोणी दिल्या होत्या, याचा सखोल तपास पोलीस करत असल्याची माहिती गुन्हे विभागाचे उपनिरीक्षक गोविंद केंद्रे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT