जयंत धुळप
रायगड ः बँक खात्यात विनादावा पडून राहीलेल्या ठेवी खातेदारांना परत करण्याकरिता 1 ऑक्टोबर 2025 पासून हाती घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेंत 15 डिसेंबर पयर्र्ंत रायगड जिल्ह्यातील विविध बँकांतील 1029 खातेदारांना 4 कोटी 60 लाख 3 हजार 357 रुपये रक्कम परत करुन त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. विनादावा असलेल्या 1029 खातेदारांना परत करण्यात आलेल्या या एकूण 4 कोटी 60 लाख 3 हजार 357 रुपये रकमे पैकी 910खातेदारांच्या ठेवी एक लाख रुपयांच्या आतील आहेत तर 119 खातेदारांच्या ठेवी एक लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या असल्याची माहिती बँक ऑफ इंडियाचे रायगड जिल्हा लिड बँक मॅनेजर विजयकुमार कुलकर्णी यांनी दैनिक पूढारी शी बोलताना दिली आहे.
15 डिसेंबर अखेर 77 टक्के लक्षांक साध्य
रायगड जिल्ह्यातील विविध बँकांमधील वैयक्तीक, संस्था आणि सरकारी योजनांच्या खात्यांमध्ये तब्बल 158 कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी असून त्या संबंधीत खातेदारांना उपलब्ध करुन देण्याकरिता रायगड जिल्ह्याची शासन नियूक्त अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ इंडियाने सर्व बँकाच्या सहयोगाने विशेष मोहिम जिल्ह्यात 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 या कालानधीत हाती घेतली आहे. या अतंर्गत रायगड जिल्ह्यास 6 कोटी रुपयांच्या विनादावा रकमा संबंधीत खातेदार वा त्याचे वारस यांनी परत करण्याचा लक्षांक देण्यात?आला होता. 15 डिसेंबर अखेर या लक्षांका पैकी 77 टक्के लक्षांक साध्य करण्यात आले असल्याचे विजयकुमार कुलकर्णी यांनी पूढे सांगीतले.
30 विविध बँकांपैकी 15 बँकांचा सक्रीय सहभाग
रायगड जिल्ह्यात 30 विविध बँकांपैकी 15 म्हणजे 50 टक्के बँकांनी या मोहिमेत सक्रीय योगदान दिले आहे. यामध्ये बँक ऑफ इंडिया प्रथम तर स्टेट बँक ऑफ इंडिया द्वितीय क्रमांकावर आहे. बँक ऑफ इंडियाने आपल्या एक लाखा आतील 394 खातेदारांना 24 लाख 47 हजार 329 रुपये तर एक लाखावरील 29 खातेदारांना 1 कोटी 60 लाख 80 हजार 356 रुपये रक्कम जमा केली आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या एक लाखा आतील 224 खातेदारांना 32 लाख 96 हजार 895 रुपये तर एक लाखावरील 29 खातेदारांना 1 कोटी 12 लाख26 हजार 374 रुपये रक्कम जमा केली आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेने आपल्या एक लाखा आतील 38 खातेदारांना 7 लाख 23 हजार 327 रुपये तर एक लाखावरील 4 खातेदारांना 5 लाख 58 हजार 816 रुपये रक्कम जमा केली आहे.
ठेवी परत मिळवण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत
दावा न केलेल्या ठेवी संबधीत खातेदारांनी दावा करुन आपल्या ताब्यात घेतल्या नाहित , बँक खाते 10 वर्षांपासून निष्क्रिय असेल तर रिझर्व्ह बँक ऑफ ईंडीयाच्या निर्णयानुसार ठेवी शिक्षण आणि जागरूकता निधीमध्ये हस्तांतरित केली जाऊ शकते. पण खातेदारशांनी पैसे गमावलेले नाहीत. त्यांना त्यांचे पैसे परत मिळू शकतात. त्याकरिता खातेेदारांनी आपल्या बँकेत जावून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे करणे आवश्यक आहे. दावा विनंती आणि अपडेटेड केवायसी सादर करावे. आणि त्याकरिताच दावा न केलेल्या ठेवींचा जलद निपटारा सुकर करण्यासाठी विशेष मोहीम 31 डिसेंबर 2025 या कालावधीत देशातील सर्व बँकांच्या माध्यमातून अमलात आणण्यात आली आहे. त्याकरिता सर्व बँकांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात जनजागृती शिबीरांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. त्याचा लाभ बँक खातेदारांनी घ्यावा असे आवाहन कुलकर्णी यांनी अखेरीस केले आहे.