महाड : मागील दोन दशकांपासून थकीत असलेली महाड नगर परिषदेची एमआयडीसी कडील 27 कोटी रुपयांची पाणीपट्टी पैकी 17 कोटी रुपये उद्योग मंत्री म्हणून आपण माफ करीत असल्याची घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महाड येथील विजय मेळाव्याप्रसंगी करून महाडकर नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.
नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील कविस्कर आणि नगरसेवकांच्या सत्काराचा कार्यक्रम महाड शहरातील संत रोहिदास नगर समाज मंदिरामध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांच्या समवेत मंत्री भरतशेठ गोगावले, नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील कविस्कर, जिल्हा प्रवक्ते नितीन पावले ,जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, विजय आप्पा खुळे, सपना मालुसरे यांसह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका व पराभूत नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते.
नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांनी आपल्या भाषणामध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांना नगरपरिषदेची एमआयडीसीकडे असलेल्या थकीत पाणीपट्टी बाबत लक्ष देण्याची व ते कमी करण्याची मागणी केली होती ,याचा संदर्भ घेत मंत्री उदय सामंत यांनी आपल्या भाषणामध्ये एकूण 27 कोटी पैकी 17 कोटी रुपये आपण माफ करीत असल्याचे सांगीतले.
उर्वरित 10 कोटी मध्ये 8 कोटी मुद्दल व 2 कोटी व्याज ही रक्कम नगर परिषदेने येत्या पाच वर्षात हप्त्याने पूर्ण करावी अशी सूचना करून महाडकर नागरिकांना एक अनोखी भेट दिली. नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक नगरसेविकांचे अभिनंदन करताना संघर्षातून यश कसे प्राप्त करायचे हे भरतशेठ यांच्याकडून शिकावे याकरताच आपण या ठिकाणी आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भरतशेठ गोगावले यांची नॅपकिनची असलेली जादू या विजयाने पुन्हा एकदा राज्याला दाखवून दिल्याचे सांगीतले. समोरच्याने डोळसपणे पाहण्यासाठी त्यांना मोठी दुर्बीण द्या अशी सूचना केली. बॅ.ए.आर.अंतुले यांच्या नंतर कोकणाच्या विकासाकरता प्राधान्याने काम करणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे असलेले विशेष लक्ष पाहता आगामी काळात महाडमधील कोणतीही समस्या राहणार नाही याची आपण काळजी घेऊ असे सांगितले.
आगामी काळात नगर परिषदेमध्ये असलेले संख्याबळ वाढण्यासाठी भरतशेठ करीत असलेले प्रयत्न लवकर पूर्ण होवोत, अशी शुभेच्छा देवून शेठचे नेतृत्व स्वीकारल्याशिवाय अस्तित्व निर्माण होत नाही अशा शब्दात भरतशेठ गोगावले यांच्या कार्याचा गौरव केला.
जिल्हा प्रमुख प्रमुख घोसाळकर यांनी आपल्या मनोगतामध्ये आगामी वर्षात पालकमंत्री पदाचा टिढा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सोडवावा असे आवाहन केले. पालकमंत्री पदावरून दूर ठेवल्याने सर्वत्र असलेली नाराजी या निवडणुकीच्या माध्यमातून दिसून आली असे भाष्य त्यांनी केले.
नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांनी आपल्या भाषणामध्ये गेल्या तीन दशकांचा महाडचा वनवास संपल्याचे सांगून जिकडे कविस्कर तिकडे सत्ता हे समीकरण पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे जाहीर केले. आगामी काळात 8 चे 12 कसे होतील याकरता देखील आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगून मंत्री उदय सामंत यांनी महाड नगरपरिषदेची एमआयडीसीकडे असलेली थकीत पाणीपट्टीची रक्कम कमी करावी अशी आग्रही मागणी केली.
जिल्हा प्रवक्ते नितीन पावले यांनी आपल्या मनोगतामध्ये गेल्या अनेक वर्षाची असलेली शिवसैनिकांची इच्छा या विजयाने पूर्ण झाली असून मंत्री भरतशेठ गोगावले यांना दिलेल्या शब्दातून महाडकर उतराई होत असल्याचे सांगून शिवसेनेवर असलेला गेल्या अनेक वर्षांचा हा डाग पुसून काढल्याचे सांगितले. आगामी काळात महाडचा विकास हा मंत्री भरतशेठ गोगावले व विकास गोगावले तसेच मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक वेगात होईल असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका, नगराध्यक्ष सुनील कविस्कर व श्रीवर्धन येथील नगरसेवकांचा मंत्री उदय सामंत व मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सिद्धेश पाटेकर यांनी केले.
हा तर महाडकरांचा विजय ः ना.भरतशेठ गोगावले
मंत्री भरत शेठ गोगावले यांनी आपल्या भाषणाची सुरुवात सर्व महाडकरांना धन्यवाद देऊन करताना आजचा हा विजय म्हणजे नवे व जुने शिवसैनिकांनी तसेच महिला ,युवा सेनेने केलेल्या कामाचा एकत्रित परिणाम असल्याचे सांगून हा महाडकरांचा विजय असल्याचे नमूद केले. रायगडच्या राजकारणात शिवसेनेचे असलेली ताकद आता कोणी विरोधक नाकारू शकणार नाहीत असे सांगून येणाऱ्या काही दिवसातच श्रीवर्धन येथेही चमत्कार करण्याची त्यांनी संकेत दिले.
आपण कोणाच्या वाटेला जायचे नाही मात्र आपले अंगावर कोणी आल्यास त्याला शिंगावर घेतल्याशिवाय राहायचे नाही या त्यांच्या लोकप्रिय घोषणेचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. पोलीस प्रशासनाने शिवसैनिकांसंदर्भातील असलेल्या घटनांबाबत योग्य पद्धतीने लक्ष देण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली.
संपूर्ण राज्याचे लक्ष भरत गोगावले यांच्या महाड नगर परिषदेकडे होते. यावरून या नगरपरिषदेतील विजयाचे महत्व अधोरेखित होते. राजकारणात व्यक्तिगत आरोप प्रत्यारोप व टीका करण्यापेक्षा विकासात्मक बाबींवर भर देण्याची आवश्यकता असून, समाजकारणाच्या माध्यमातून ही कामे केली जाणे शक्य आहे. नगराध्यक्ष पदाचे दुसरे दावेदार नितीन पावले हे आम्हाला पावले म्हणूनच सत्ता आली.उदय सामंत, उद्योगमंत्री