वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना दहा दिवसांत ४२ लाखांचा दंड pudhari photo
रायगड

Raigad Traffic Enforcement: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना दहा दिवसांत ४२ लाखांचा दंड

रायगड वाहतूक पोलिसांची चार हजार वाहनचालकांवर कारवाई; बेशिस्त वाहतुकीला लागणार शिस्त

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : सुवर्णा दिवेकर

शिस्त आणि नियम मोडणाऱ्यांवर कारवाई ही होतेच हे वाहतूक शाखेने नेहमीच दाखवले आहे. नुकत्याच शाळा महाविद्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे अधिक कठोरपणे वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाईचा बडगा उचलला जात आहे. दहा दिवसात चार हजार २७ चालकांना दणका मिळाला आहे.

बेशिस्त चालकांविरोधात कारवाई करीत जिल्हा वाहतूक शाखेने ४२ लाख ३१ हजार ४२७ रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती समोर आली आहे. नियम मोडणाऱ्या चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न या दंडात्मक कारवाईतून करण्यात आला आहे.

रायगड पोलीस दलाच्या अखत्यारित २८ पोलीस ठाणे आहेत. त्यात ११ पोलीस ठाणे सागरी आहेत. जिल्ह्यामध्ये साधारणतः अडीच हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यामध्ये जिल्हा वाहतूक शाखेमध्ये साधारणतः ८० हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी आहेत. जिल्ह्यात वाढते पर्यटन व औद्योगिकीकरणामुळे वाहनांची संख्याही प्रचंड वाढू लागली आहे.

दुचाकी वाहने वर्षाला २५ हजारहून अधिक नोंदणी केली जात आहे. त्यामुळे दुचाकी वाहनांची संख्याची वाढही दिवसेंदिवस होत आहे. वाहने खरेदी केली असली, तरी अनेक जण वाहतूकीच्या नियमांचे पालन करीत नाही. वाहन वेगात चालविणे, ट्रीपल शीट असणे, क्षमतेपक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणे, अशा अनेक वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविले जातात. त्यामुळे अपघात होण्याची भिती अधिक असते. त्यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने कायमचे अपंगत्व येते. काहींना जीव गमवावा लागतो. हेल्मेट न घातल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असते.

अपघाताबरोबरच मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेकडून वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती केली जाते. शाळा, महाविद्यालयांमध्ये शिबीराच्या मार्फत जनजागृती केली जाते. रस्त्यांवर ठिकठिकाणी जनजागृती फलक लावले जातात. तरीदेखील काही चालक वाहन बेफिकरपणे चालवून अपघाताला बळी पडतात.

बेशिस्त चालकांना शिस्त लावण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेच्या माध्यमातून नियमीत कारवाई केली जाते. जिल्हयातील राष्ट्रीय, राज्य, जिल्हा मार्गासह नाक्यानाक्यावर वाहतूक पोलीस तैनात करून चालकांविरोधात कारवाई केली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT