कोकणातील दीड आणि पाच दिवसांच्या गणपतींचे आगमन होऊन विसर्जनही सुरळीत पार पडले. मुंबईहून कोकणात येताना आणि जाताना गणेशभक्तांना काही ठिकाणी खड्ड्यांचा सामना करावा लागला. मात्र वाहतूक सुरळीत सुरू असल्याने सुदैवाने एकही अपघाताची नोंद झालेली दिसत नाही. महामार्गावर वाहतूक निर्विघ्न होत असताना माणगावमध्ये मात्र वाहतूककोंडीचे विघ्न कायम आडवे येत आहे. मुंबईला ये-जा करताना माणगाव येथील वाहतूककोंडीने गणेशभक्त तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
गणेशोत्सवाच्या आगमनापुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा पनवेल ते महाड असा पाहणी दौरा केला होता. त्या दौर्यात कॉन्ट्रॅक्टर आणि प्रशासनाला धारेवर धरले होते. तर संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर माणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर प्रशासन, पोलिस आणि ठेकेदार खडबडून जागे झाले. महामार्गावर भरपावसात दिवसरात्र खड्डे बुजविण्यासाठी कार्यवाही सुरू झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौर्या अगोदर मुंबई-गोवा महामार्ग होण्यासाठी माणसामध्ये सहा दिवस आमरण उपोषण सुरू होते. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा दौरा केला होता.
पनवेल ते माणगाव या 90 किमी अंतरात पाच ठिकाणी एकाचवेळी खड्डे भरण्यासाठी काम सुरू झाले. बहुतांश ठिकाणी खड्डे आधुनिक तंत्रज्ञानाने भरले. त्यामुळे गणेश भक्तांनी समाधान व्यक्त केले. इंदापूर, माणगाव आणि लोणेरे येथे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलीस, सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवक ठिकठिकाणी तैनात करण्यात आले. मात्र माणगाव शहरातील महामार्गाचे रुंदीकरण झालेले नाही. इंदापूर आणि माणगाव या बायपासचे काम रखडले आहे. तसेच लोणेरे उड्डाण पूल तयार नसल्याने इंदापूर, माणगाव आणि लोणेरे या 20 किमी अंतरात सातत्याने वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे वाहनांच्या 2 ते 3 किमीच्या रांगा लागतात. इंदापूर ते लोणेरे येथे जाण्यासाठी दोन ते तीन तासाचे विघ्न येत आहे. माणगावच्या काळ नदीवरील नवीन पुलाचे काम कासवगतीने सुरू आहे. त्याचे काम पावसाळ्यात थांबले आहे. त्यामुळे काळ नदी पुलावरून एकेरी वाहतूक होत असल्याने संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे वाहनांच्या रांगा दिसत असतात.