

रोहा : धाटाव एमआयडीसीतील साधना नायट्रोकेम कंपनीत आज (दि.12) सकाळी भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. ODB 2 उत्पादन धुण्यासाठी असलेल्या मेथानोल स्टोरेज टँकवर वेल्डिंगचे काम सुरू होते, त्याच स्पार्किंगने मेथानोल टँकचा स्फोटक भडका उडाला, थरकाप उडवणाऱ्या स्फोटात २ कामगारांचा तडफडून जागीच मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. स्फोटात ४ कामगार जखमी झाले आहेत तर, त्यातील ३ गंभीर जखमी कामगारांना उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आल्याची माहिती कंपनी प्रशासक विद्याधर बेडेकर यांनी दिली. त्यातील एका कामगाराची प्रकृती चिंताजनक आहे.
स्फोटाची तीव्रता प्रचंड होती की, स्फोटाच्या आवाजाने धाटाव, बारसोली यांसह लगतच्या वस्तीतील घरांच्या खिडक्या हलल्या. भयानक स्फोटात कामगार मृत्युमुखी पडल्याने कामगारांची सुरक्षा पुन्हा एकदा अक्षरश: रामभरोसे झाली आहे. येथील अनेक कंपन्यांत स्फोटाची मालिका सुरूच असल्याने कामगारांत कायम भितीचे वातावरण राहिले आहे. आगीच्या घटना व जीवघेणे स्फोट रोखण्यात कंपन्या प्रशासन नेहमीच अपयशी ठरले. यावर आजही साधना कंपनीची स्फोटाची मालिका खंडीत होणार तोच गुरुवारच्या भयानक स्फोटाने साधना कंपनी पुन्हा डेंजर झोनमध्ये आली असल्याचे बोलले जात आहे. तर, या भीषण स्फोटाने एमआयडीसीतील कंपन्या पूर्णतः सुरक्षीत नाहीत ? हेच ठळक झाले आहे.
धाटाव एमआयडीसीतील अनेक कंपन्यांत स्फोट होण्याच्या घटना वाढल्या आहेत. मागील दोन-तीन वर्षात अपघात व स्फोटक घटनांनी कामगारांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाला. स्फोटक घटनांत अनेक कामगारांना जीव गमवावा लागला. मागील काळात झालेल्या कंपनीतील आगीच्या व अपघात घटनाने एमआयडीसीचीच सुरक्षा धोक्यात आली की काय ? असेच भयान वास्तव होते. त्यातून सुरक्षा उपायांवर प्रचंड चर्चा, खलबते झाली. मात्र, अपघात घटनांतून कोणत्याच कंपनी व्यवस्थापनाने बोध घेतलेला नाही. याच घडामोडीत गुरुवारी साधना कंपनीत भीषण स्फोटाची घटना घडली.
वेल्डिंगची ठिणगी पडल्याने मिथेनॉल टाकीचा स्फोट झाला, त्या स्फोटात संजीव कुमार, दिनेश कुमार (उत्तरप्रदेश) या २ कामगारांचा दुर्दैवी अंत झाला. तर, बोसकी यादव यांसह दोन गंभीर कामगारांना पुढच्या उपचारार्थ मुंबई हलविण्यात आले, एका जखमी कामगारावर रोहा खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे अशी माहिती कंपनी प्रशासक विद्याधर बेडेकर यांनी दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाने घटनास्थळी तातडीने धाव घेत परिस्थिती हाताळली. माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी यावेळी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. स्फोटाची तीव्रता प्रचंड होती की, शेजारील गावातील घरांच्या खिडक्या हालल्या, आजूबाजूच्या वस्तीतील घरांना चांगलाच हादरा बसल्याचे नागरिकांनी सांगितले. स्फोटाची घटना समजताच नागरिकांनी कंपनीसमोर एकच गर्दी केली. त्यामुळे पोलिसांनी अधिक बंदोबस्त वाढवला. साधना कंपनीच्या भीषण स्फोटाने एमआयडीसीतील कंपन्यांत अपघाताची मालिका सुरूच आहे. वाढत्या अपघातातून कामगारांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.