माणगाव : कमलाकर होवाळ
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील माणगाव हे कोकण व तळकोकणाचे प्रमुख प्रवेशद्वार मानले जाते. मात्र, सध्या हाच माणगाव परिसर प्रवाशांसाठी मोठे अडथळ्याचे केंद्र ठरत असून, सलग तीन दिवसांच्या सुट्यांमुळे येथे भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मुंबई व पुणे बाजूकडून कोकणात जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांच्या रांगा तब्बल सहा किलोमीटरपर्यंत लागल्या होत्या.
शनिवार, रविवार आणि सोमवार अशा सलग तीन दिवसांच्या सुट्यांचा लाभ घेत मुंबई, ठाणे, पुणे तसेच पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील असंख्य पर्यटक आणि चाकरमानी मुंबई गोवा महामार्ग तसेच पुणे ताम्हाणी घाट मार्गे कोकणात दाखल होत आहेत. थंडीचा आनंद घेण्यासाठी तसेच येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपापल्या गावाकडील राजकीय गणिते जुळवण्यासाठी मोठ्या संख्येने लोक प्रवास करत आहेत. मात्र, मुंबई गोवा महामार्गावरील इंदापूर बायपास आणि माणगाव बायपासची अपूर्ण कामे, तसेच महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरण यामुळे वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. माणगाव बाजारपेठ परिसरात वाहतूक कोंडीचा तिढा सुटता सुटेना अशी अवस्था निर्माण झाली असून, वाहनचालक अक्षरशः तासन्तास अडकून पडले आहेत.
एसटी महामंडळाच्या बस, खाजगी बसेस, चारचाकी वाहने, रिक्षा, दुचाकी अशा सर्वच वाहनांच्या लांबच लांब रांगा महामार्गावर दिसून येत आहेत. या कोंडीमुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. अनेक नागरिकांना पाणी, नाश्ता व जेवणावाचून प्रवास करावा लागला, तर स्वच्छतागृहांची सोय नसल्याने महिला, वृद्ध आणि लहान मुलांना विशेष अडचणींचा सामना करावा लागला.
वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी महामार्ग पोलीस आणि माणगाव पोलीस प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत असून, पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना वाहन चालकांना देण्यात आले आहेत, तसेच रायगड कडे जाणाऱ्या व तळ कोकणात जाणाऱ्या वाहनांना निजामपूर मार्गे वाहतूक वळविण्यात आली. तरीही वाहनांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त असल्याने कोंडी पूर्णतः नियंत्रणात येण्यासाठी वेळ लागत आहे.
दरम्यान, ‘इंदापूर व माणगाव बायपासची कामे वेळेत पूर्ण झाली असती, तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती,’ अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी नागरिकांकडून व्यक्त होत आहे. हा वाहतूक कोंडीचा तिढा नेमका केव्हा सुटणार, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत. एकीकडे कोकण पर्यटनासाठी देशभरातून पर्यटकांना आकर्षित करत असताना, दुसरीकडे अपूर्ण रस्ते कामे आणि नियोजनाअभावी निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे कोकण प्रवास त्रासदायक ठरत आहे.
पोलीस प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न
वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी महामार्ग पोलीस आणि माणगाव पोलीस प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत असून, पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना वाहन चालकांना देण्यात आले आहेत, तसेच रायगड कडे जाणाऱ्या व तळ कोकणात जाणाऱ्या वाहनांना निजामपूर मार्गे वाहतूक वळविण्यात आली. तरीही वाहनांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त असल्याने कोंडी पूर्णतः नियंत्रणात येण्यासाठी वेळ लागत आहे.