Raigad tourism pudhari photo
रायगड

Raigad tourism : कर्जतमधील पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा वाढता ओढा !

ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही उभारी; प्रस्तावित धरणे, टाटा जलसाठा योजना, टोरेंट प्रकल्पामुळे पर्यटनावर परिणाम होण्याची भीती

पुढारी वृत्तसेवा

नेरळ : आनंद सकपाळ

सह्याद्रीच्या कुशीत वसलेला कर्जत तालुका पावसाळा सुरू होताच हिरवाईने नटला असून, येथील निसर्गरम्य पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. धुक्याची चादर पांघरलेले डोंगर, फेसाळून वाहणारे धबधबे, खळाळणारे ओढे, दऱ्या-खोऱ्यांचे विहंगम सौंदर्य आणि आल्हाददायक वातावरण अनुभवण्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे तसेच राज्यासह देशाच्या विविध भागांतून हजारो पर्यटक कर्जत तालुक्यात दाखल होत आहेत.

जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण माथेरान, खांडस मार्गे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भिमाशंकर, कोंडाणा लेणी, पेब (विकटगड), इर्शाळगड, सोंडाई किल्ला, तुंगी, ढाक परिसर, उल्हास नदीचे पात्र तसेच सह्याद्री पर्वतरांगांतील असंख्य धबधबे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहेत. ग्रामीण भागात विकसित झालेली होमस्टे, फार्महाऊस, रिसॉर्ट आणि कृषी पर्यटन तथा ॲग्रो टुरिझम संस्कृतीही पर्यटकांना भुरळ घालत आहे. परिणामी शनिवार-रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी या पर्यटनस्थळांवर गर्दी होत आहे.

या पर्यटनामुळे होमस्टे, रिसॉर्ट, फार्महाऊस, खानावळी, स्थानिक वाहनचालक, ट्रेक मार्गदर्शक, घोडेवाले, महिला बचत गट, हस्तकला विक्रेते, शेतकरी आणि स्थानिक व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळत आहे. ग्रामीण महिलांनी तयार केलेले घरगुती खाद्यपदार्थ, गरमागरम भजी, वडापाव, मक्याचे कणीस, मध, करवंद, जांभूळ आणि इतर स्थानिक उत्पादनांनाही पर्यटकांकडून मोठी मागणी होत आहे. त्यामुळे पर्यटन हा कर्जत तालुक्यातील अनेक गावांच्या उत्पन्नाचा प्रमुख आधार बनला आहे.

पर्यटनवाढीच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील प्रस्तावित विकास प्रकल्पांबाबत चर्चा आणि चिंता दोन्ही वाढू लागल्या आहेत. टाटा समूहाच्या जलसाठा योजनेशी संबंधित सुरू असलेली कामे, प्रस्तावित ३००० मेगावॅट क्षमतेचा टोरेंट जलविद्युत प्रकल्प तसेच शिलार आणि पोसरी नदीवरील प्रस्तावित धरण प्रकल्प स्थानिकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

प्रकल्प समर्थकांच्या मते हे प्रकल्प ऊर्जा निर्मिती, पाणी व्यवस्थापन आणि राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचे आहेत. तर दुसरीकडे प्रकल्पबाधित नागरिक, पर्यावरणप्रेमी, वन्यजीव अभ्यासक आणि प्राणीमित्रांचे म्हणणे आहे की, या प्रकल्पांच्या अंमलबजावणीदरम्यान जंगल क्षेत्र, जैवविविधता, वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास आणि पर्यटनाचे प्रमुख आकर्षण असलेल्या निसर्गसंपदेचे संरक्षण करण्यासाठी शासनाने स्पष्ट आणि ठोस भूमिका जाहीर करावी. 

दरम्यान, वाढत्या पर्यटक संख्येबरोबर सुरक्षिततेचाही प्रश्न महत्त्वाचा ठरत आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर धोकादायक धबधबे, वेगवान नदीपात्र आणि दरडप्रवण भागांपासून दूर राहावे, वाहतूक नियमांचे पालन करावे तसेच प्लास्टिकमुक्त आणि स्वच्छ पर्यटनाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

नागरिकांकडून आणखी एक प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रस्तावित प्रकल्पांमुळे कर्जतच्या निसर्गसंपदेवर, पर्यटन उद्योगावर आणि स्थानिकांच्या उपजीविकेवर नेमका काय परिणाम होईल, याबाबत शासनाने माहिती व अधिकृत भूमिका जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. कर्जत तालुक्याचे पर्यटन हे केवळ निसर्ग अनुभवण्याचे साधन नसून हजारो स्थानिक कुटुंबांच्या उपजीविकेचा आधार आहे. त्यामुळे कोणताही विकास प्रकल्प राबविताना पर्यावरण, पर्यटन आणि स्थानिकांच्या रोजगाराचा समतोल राखत पारदर्शक निर्णय प्रक्रिया राबविणे हीच काळाची गरज असल्याचे मत हे संपूर्ण कर्जत तालुक्यातील परिसरातून व्यक्त होत आहे.

प्रशासनाकडून ठोस उपाययोजनांची आवश्‍यकता

'ग्रीन बेल्ट' म्हणून ओळख असलेल्या कर्जत तालुक्याची खरी ओळख येथील घनदाट जंगले, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, गड-किल्ले, लेण्या, धबधबे, नद्या आणि समृद्ध वन्यजीवसंपदा ही आहे. या नैसर्गिक संपदेवर परिणाम झाल्यास स्थानिक पर्यटन व्यवसाय, होमस्टे, रिसॉर्ट, फार्महाऊस, कृषी पर्यटन, स्थानिक रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होऊ शकतात, अशी भीती काही स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी व्यक्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT