श्रीवर्धन : भारत चोगले
वाढत्या पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन नगरपरिषदेतर्फे बांधण्यात आलेल्या सुसज्ज पर्यटक निवास इमारतीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. ही इमारत मद्यपिंचा अड्डा बनली आहे.
श्रीवर्धन हे कोकणातील एक निसर्गरम्य व ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर असून, गेल्या काही वर्षांत येथे पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. स्वच्छ समुद्रकिनारे, शांत निसर्ग आणि ऐतिहासिक स्थळांमुळे देश-विदेशातील पर्यटकांची पावले श्रीवर्धनकडे वळत आहेत. या वाढत्या पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर, श्रीवर्धन नगरपरिषदेने 2013 साली दूरदृष्टी ठेवून एक अत्याधुनिक आणि सुसज्ज पर्यटक निवास उभारला होता.
हा पर्यटक निवास कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आला. चार वातानुकूलित खोल्या, भोजन कक्ष, उपहारगृह आणि आरामदायक वास्तू ही या निवासाची वैशिष्ट्ये होती. या प्रकल्पाचे उद्घाटन तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात पार पडले होते. नगरपरिषदेने याचे व्यवस्थापन कंत्राटी पद्धतीने देऊन उत्पन्नाचा स्रोत निर्माण केला होता, ज्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेला आर्थिक बळकटी मिळण्याची सुरुवात झाली होती.
परंतु, 3 जून 2020 रोजी आलेल्या ’निसर्ग’ चक्रीवादळाने या सार्या चित्रावर काळोख टाकला. वादळात पर्यटक निवासाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. छताचे पत्रे उडाले, संरचनात्मक घटकांची पडझड झाली आणि संपूर्ण आवाराच धोकादायक बनले. परिणामी, कंत्राटी व्यवस्थापकाने या जबाबदारीतून हात झटकले. आज या घटनेला जवळपास पाच वर्षे झाली, तरीही पर्यटक निवास दुरुस्त होण्याऐवजी अधिकच दुर्लक्षित झाला आहे.
आजची वस्तुस्थिती पाहता, नगरपरिषदेचा हा बहुमूल्य प्रकल्प पूर्णतः धुळीला मिळालेला आहे. सुंदर आणि आधुनिक सुविधा असलेली ही इमारत आता मद्यपी, भिकारी, फेरीवाले व मनोरुग्णांचे थांबे ठरली आहे. रात्रीच्या वेळी येथे भीतीदायक वातावरण निर्माण होते, जे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोक्याचे ठरत आहे.
या दुरवस्थेमागे प्रशासनाची उदासीनता की निधीअभाव हे अद्याप स्पष्ट नाही. पण या प्रकल्पासाठी कोट्यवधींचा निधी खर्च झाल्याचे लक्षात घेता, स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचा सूर दिसून येतो. पर्यटकांच्या संख्येत वाढ होत असतानाही, त्यांच्या निवासाची सोय योग्य पद्धतीने न केल्याने श्रीवर्धनचा पर्यटन विकास थांबलेला आहे.
श्रीवर्धनकरांचा ठाम विश्वास आहे की, जर ही इमारत दुरुस्त करून पुन्हा एकदा कंत्राटी पद्धतीने चालवण्यास दिली गेली, तर एकीकडे गरजू युवकांना रोजगार उपलब्ध होईल आणि दुसरीकडे नगरपरिषदेचे आर्थिक उत्पन्न पुन्हा सुरू होईल.
आजच्या घडीला पर्यटन क्षेत्रात वाढीव सुविधा देण्याची गरज आहे, आणि हा पर्यटक निवास त्यासाठी योग्य साधन ठरू शकतो.
श्रीवर्धन नगरपरिषदेने त्वरित दखल घेऊन या पर्यटक निवासाचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे. अन्यथा, कोट्यवधींचा निधी वाया गेल्याचे दुर्दैव कायम राहील. स्थानिक विकासासाठी, पर्यटनाच्या वाढीसाठी आणि आर्थिक स्वावलंबनासाठी हा प्रकल्प नव्याने सुरु होणे काळाची गरज बनली आहे.
रायगड जिल्हयाला पर्यटकांची पसंती वाढत आहे. अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन येथील सुंदर समुद्र किनार्यांमुळे दररोज हजारो पर्यटक येथे येत आहेत. त्यामुळे त्यांना उत्तम दर्जाच्या सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. श्रीवर्धनमधील पर्यटकांची बांधण्यात आलेली पर्यटन निवास ही अत्यंत महत्वाची सुविधा मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अडगळीत पडल्यासारखी झाली आहे.