उरण (रायगड) : शुक्रवारपासून (दि.15) सुरू असलेला वादळी पाऊस आणि खराब हवामानामुळे दोन दिवसांत 250 मच्छीमार बोटी मासेमारी न करताच विविध बंदरांत परतल्या आहेत. यामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे.
बंदी उठल्यावर मासेमारी हंगाम सुरू झाला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने खोल समुद्रात मासेमारी करणार्या शेकडो बोटी विविध बंदरातून मासेमारीसाठी रवाना झाल्या होत्या. मात्र, शुक्रवारपासून सुरू झालेला वादळी पाऊस व खराब वातावरणामुळे शेकडो मासेमारी बोटी शुक्रवारपासूनच (दि.15) माघारी येण्यास सुरुवात झाली. 250 मच्छीमार बोटींनी जयगड, दाभोळ, रत्नागिरी, रायगडमधील अलिबाग, रेवदंडा आदी बंदरांचा आश्रय घेतला.खराब हवामानाची स्थिती अशीच राहणार आहे त्यामुळे 22 ऑगस्टपर्यंत मासेमारी बंद राहणार आहे.
मच्छीमारांना मिळालेल्या आदेशानुसार येत्या 22 ऑगस्टपर्यंत वादळी पाऊस व खराब हवामानाची स्थिती अशीच राहणार आहे, त्यामुळे 22 ऑगस्टपर्यंत खोलसमुद्रातील आणि पर्सेर्सियन मासेमारी बंद ठेवावी लागणार आहे.रमेश नाखवा, संचालक, वेस्ट कोस्ट पर्ससीन नेट असोसिएशन