The government has instructed to increase the number of students in Zilla Parishad schools by 25 percent.
अलिबाग : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेच्या शाळेत पटसंख्या वाढली नाही तर त्याचा परिणाम शाळा बंद कराव्या लागतील यासाठी शासनाने जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येत २५ टक्के वाढ करण्याची सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सुटीचा आनंद उपभोगण्याऐ-वजी शिक्षक वाडीवस्तीवर विद्यार्थ्यांच्या शोधार्थ फिरत आहेत.
रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण २,५०१ प्राथमिक शाळा आहेत, त्यामध्ये एकूण ८७,०९२ विद्यार्थी संख्या आहे. शिक्षण विभागातर्फे विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासह गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शहरी भागाकडे ओढा जास्त असल्यामुळे ग्रामीण भागातील शाळांमध्ये पटसंख्येला घरघर लागली आहे. शासनातर्फे जिल्हा परिषद शाळांमध्ये सीबीएसई माध्यमाचा अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहे.
त्यासाठी शाळांमध्ये नियोजन सुरू झाले आहे. गेल्या काही वर्षात जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे शाळांची संख्यासुद्धा घटली आहे. झालेली घट भरून काढण्यासाठी शासनाकडून दरवर्षी शाळांना पटसंख्या वाढविण्याचे उद्दिष्ट देण्यात येते. या वर्षीही २५ टक्के पटसंख्या वाढविण्याचे उद्दिष्ट असून पूर्ततेसाठी शिक्षक, मुख्याध्यापक घरोघरी जाऊन पालकांच्या भेटी घेत आहेत.
शासनाकडून विद्यार्थी संख्या वाढविण्याची सूचना जरी करण्यात आली असली तरी त्याबाबत केलेल्या कामाचा अहवाल शाळांनी शिक्षण विभागाला पाठवायचा आहे. दि. ३० सप्टेंबरपर्यंत टप्प्याटप्याने सहा वेळा शाळांनी अहवाल सादर करायचा आहे. त्यामुळे शिक्षक, मुख्याध्यापकांची जबाबदारी वाढली आहे.
तसेच शासनाच्या सेवेत असणारे अधिकारी कर्मचारी ह्यांनी मी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी असे फोटोंसह तयार करून शाळेच्या आवारात लावायचे आहेत जेणेकरून विद्यार्थी वाढीसाठी उपयोग होईल. ग्रामीण भागातील पालकांचा शहराकडे ओढा अधिक आहे. त्यातच इंग्रजी माध्यमाकडे कल अधिक असल्याने खासगी शाळेत प्रवेश घेण्यात येतो. ग्रामीण भागातील शाळांच्या पटसंख्या वाढविण्याचे उद्दिष्ट पूर्तीसाठी शिक्षक प्रयत्न करत आहेत.
जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या २५ टक्के वाढली पाहिजे, त्यासाठी शाळांना उद्दिष्ट दिले आहे. शाळांनी पटसंख्या वाढविल्याचा अहवाल सादर करायचा आहे. शिक्षण विभागाकडे सहावेळा अहवाल सादर करावा. पालकांची भेट घेऊन पाल्याची शाळा बदलणार नाहीत, यासाठी भेट घेत संवाद साधावा. विद्यार्थी वाढ अपेक्षित आहे.पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी