रायगड : विधानसभा निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांनी राज्यातील सहा विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा आज (दि.२२) अलिबाग येथे केली. यामध्ये अलिबाग, पेण, पनवेल, उरण, सांगोला, भोकर येथील जागांचा समावेश आहे. आम्ही महाविकास आघाडीसोबतच असून आम्ही वीस जागांसाठी आग्रही असल्याचे सुतोवाच जयंत पाटील यांनी यावेळी केले.
जाहीर झालेल्या उमेदवारांमध्ये अलिबागमधून चित्रलेखा पाटील, पेण - अतुल म्हात्रे, पनवेल - बाळाराम पाटील, उरण - प्रीतम म्हात्रे, सांगोला - बाबासाहेब देशमुख तर भोकरमधून विद्यमान आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या नावाचा समावेश आहे.अलिबाग येथील शेतकरी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या मेळाव्यात बोलताना जयंत पाटील यांनी रायगडमधील चार जागांसह सांगोला आणि भोकर येथे शेकापचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला. मागील अनेक दिवसांपासून मविआ नेत्यांच्या सातत्याने बैठका सुरू आहेत. परंतु जागा वाटपात तिन्ही पक्षांचा दावा असलेल्या जागांवर वाद होत आहे. आज शेतकरी कामगार पक्षाने अलिबाग, पेण, उरण, पनवेल आणि सांगोला येथील उमेदवार जाहीर केले. आम्ही महाविकास आघाडीत आहोत, दिलेला शब्द बदललेला नाही असं विधानही जयंत पाटील यांनी केले आहे.
महाविकास आघाडीत सांगोल्यासह काही जागांवर शेतकरी कामगार पक्षाने दावा केला होता. मात्र सांगोला येथे विद्यमान आमदार शिवसेनेचा असल्याने ती जागा ठाकरे गटाला दिली. याठिकाणचे आमदार शहाजी पाटील हे शिंदेंसोबत गेले असले तरी ही जागा सोडण्यास ठाकरे गटाने नकार दिला. इतकेच नाही तर या जागेवर इच्छुक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते दीपक आबा साळुंखे यांना ठाकरेंनी त्यांच्या पक्षात प्रवेश दिला. या मतदारसंघात ठाकरे गटाकडून दीपक साळुंखे रिंगणात असतील असं बोललं जात आहे. त्यामुळे नाराज शेतकरी कामगार पक्षाने शरद पवारांची भेट घेतली. परंतु कुठलाही सकारात्मक तोडगा निघत नसल्याने आज अलिबाग येथे शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली.