प्रशांत गोपाळे
खोपोली: मुसळधार पावसात पुल तुटल्याने गावातील नागरिक, शाळकरी मुलांना दुसऱ्या गावावरून प्रवास करावा लागत असल्याने ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने मागणी करूनही पुलाचा काम सुरू होत नसल्यामुळे तिव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.
मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेवून पुलाच्या कामासाठी लोखंडी साहित्य तात्काल मागविले मात्र येत्या २० ते २५ दिवसात पूलाचे काम झाले नाहीतर तीव्र स्वरूपाचे आंदोलन पुढील काळात छेडण्यात येईल, असा इशारा ही ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.
ठाणेन्हावे गावाच्या मुख्य रहदारीचा पूल ५ जुलै रोजीच्या मुसळधार पावसात वाहून गेल्याने येथील ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली. त्यानंतर ग्रामस्थांनी शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची भेट घेत पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी केल्यानंतर प्रशासनाच्या वतीने या पुलाची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र पंधरा दिवसांमध्ये पाऊस ओसरला असतानाही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना न राबवल्याने ग्रामस्थांना मिळालेले आश्वासन आश्वासन राहिल्याने ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करत २१ जुलै रोजी आक्रमक पवित्रा घेत सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देत निवेदनातून २७ जुलै पर्यंत दुचाकी व पायी जाण्यासाठी पुलाची दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला होता
परंतु ग्रामस्थांच्या निवेदनाची सार्वजनिक बांधकाम विभाग दखल घेत २४ जुलै रोजी पुलाची पुन्हा पाहणी करत २५ जुलै रोजी ग्रामस्थांची बैठक घेत येत्या २० ते २५ दिवसात लोखंडी पुलाची उभारणी करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाला स्थगिती दिली.
येत्या वीस ते पंचवीस दिवसात पुलाची उभारणी न झाल्यास पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे. यावेळी माजी उपसरपंच संदीप बोरले, माजी उपसरपंच प्रविण लाले, सदस्य संतोष खाडे, सदस्य आरिफ नाडकर, ग्रामस्थ जयेश खाडे, अँड. भगवान लाले, रोहित मराडे, अरमान धानसे, मुनीर धानसे, कार्यकारी अभियंता संदेश पाटील व सार्वजनिक बांधकाम अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम विभाग खालापूर यांच्या वतीने आम्हाला असे लेखी आश्वासन देण्यात आले, त्यामध्ये तात्पुरत्या लोखंडी पुलाचे काम पुढील २० ते २५ दिवसांत पूर्ण करण्यात येईल. सदर आश्वासनाच्या अनुषंगाने, आम्ही प्रस्तावित आंदोलनास तात्पुरती स्थगिती देत आहोत.
तथापि, दिलेल्या कालावधीत काम पूर्ण न झाल्यास पुढील योग्य तो निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही ग्रामस्थानी राखून ठेवला असून पुढील काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही ग्रामस्थ करू असा इशारा ग्रामस्थ जयेश खाडे यांनी दिला आहे.