Matheran taxi fare hike Pudhari
रायगड

Matheran taxi fare hike: इंधन दरवाढीने माथेरानमध्ये टॅक्सीची भाडेवाढ; पर्यटकांवर सीटमागे 20 रुपयांचा अतिरिक्त भार!

डिझेल, पेट्रोल व सीएनजीच्या वाढत्या दरांसह वाहनांच्या देखभाल खर्चात झालेल्या वाढीमुळे नेरळ-माथेरान टॅक्सी चालक-मालक सेवाभावी संस्थेकडून प्रति सीट 20 रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

नेरळ: माथेरान या पर्यटनस्थळी जाण्यासाठी असलेल्या अवघड नेरळ-माथेरान घाटरस्त्यावर रात्रंदिवस सुरू असलेल्या टॅक्सी सेवांचे भाडे तब्बल सात वर्षांनंतर वाढविण्यात आले आहे. डिझेल, पेट्रोल व सीएनजीच्या वाढत्या दरांसह वाहनांच्या देखभाल खर्चात झालेल्या वाढीमुळे नेरळ-माथेरान टॅक्सी चालक-मालक सेवाभावी संस्थेकडून प्रति सीट 20 रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली आहे.

नेरळ-माथेरान घाटमार्गावर सुमारे 330 प्रवासी टॅक्सी गेल्या 50 वर्षांपासून पर्यटकांना सेवा देत आहेत. यापूर्वी प्रति सीट 100 रुपये भाडे आकारले जात होते. कोरोना काळातदेखील याच दराने सेवा सुरू ठेवण्यात आली होती. मात्र, वाढते इंधनदर, इंजिन ऑईल, स्पेअर पार्ट्स, विमा खर्च तसेच घाटरस्त्याची दुरवस्था यामुळे जुन्या दरात सेवा देणे परवडत नसल्याचे टॅक्सी संघटनेने सांगितले.

विशेष म्हणजे नेरळ-माथेरान हा सुमारे सात किलोमीटरचा अतितीव्र चढाव आणि धोकादायक वळणांचा घाटमार्ग असल्याने वाहनांवर अतिरिक्त ताण पडतो. त्यामुळे देखभाल खर्चही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चालक-मालकांचे म्हणणे आहे.

नेरळ-माथेरान टॅक्सी चालक-मालक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र मिसाळ आणि नरेश कराळे यांनी ही दरवाढ जाहीर केली. पर्यटक आणि प्रवाशांनी संस्थेला सहकार्य करावे, असे आवाहनही केले आहे. दरवाढीची माहिती देणारे फलक नेरळ टॅक्सी स्टँड तसेच माथेरान दस्तुरी नाका येथील टॅक्सी स्टँडवर लावण्यात आले आहेत.

असे आहेत नवीन दर

नवीन दरानुसार आता पर्यटकांना प्रति सीट 120 रुपये, लहान मुलांसाठी 60 रुपये, तर पूर्ण टॅक्सीचे भाडे 600 रुपये आकारले जाणार आहे. स्थानिक ग्रामस्थांसाठी मात्र जुन्याच दराने सेवा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सरकारकडून इंधनात करण्यात आलेली वाढ तसचे वाहनांच्या स्पेअर पार्ट, इन्शुरन्सच्या दरात झालेली वाढ त्यामध्येच अवघड घाट मार्गातील प्रवासामुळे या दरवाढीचा फटका आम्हाला पडते प्रतिसिट 20 रूपये भाडे वाढविण्याचा निर्णय हा संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.
- मतीन नजे, उपाध्यक्ष, नेरळ माथेरान टॅक्सी संस्था

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT