रमेश कांबळे
नवरात्री म्हणजे स्त्रीशक्तीचा उत्सव. परंपरेने देवीच्या विविध रूपांची उपासना आपण करतो, तिच्या सामर्थ्याचा गौरव करतो. घराघरांत देवीची स्थापना होते, ढोलताशांच्या गजरात स्त्रीशक्तीचे गान घुमते. पण समाजाच्या प्रत्यक्ष आयुष्यात स्त्रीशक्तीला किती व्यासपीठ मिळते, हे मात्र विचार करण्यासारखे आहे. विशेषतः खेळाच्या क्षेत्रात महिलांची नावे फारच कमी ऐकायला मिळतात. अशा वेळी रायगड जिल्ह्यातील नागाव-अलिबागची कन्या तनिषा वर्तक हिने धनुर्विद्येत राज्य व राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले यश म्हणजे नवरात्रीतल्या शक्तिस्वरूपेचा जणू ठोस प्रत्यय आहे. या खेळात अवघ्या चौदा वर्षांची तनिषा जेव्हा राज्यस्तरीय स्पर्धेत जिंकते, तेव्हा ती केवळ खेळाडू म्हणूनच नव्हे तर नवरात्रीच्या काळात स्त्रीशक्तीच्या जिवंत मूर्तीप्रमाणे भासते.
6 जानेवारी 2024 रोजी पुण्यात कै. राजाराम भिकू पठारे इनडोअर स्टेडियममध्ये फील्ड आर्चरी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि पुणे जिल्हा फील्ड आर्चरी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तेराव्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन झाले. महाराष्ट्रातील पंचवीस जिल्ह्यांतून तब्बल चारशे पन्नास खेळाडूंनी यात भाग घेतला होता. इतक्या दांडग्या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील नागाव गावातून आलेल्या तनिषाने आपल्या कौशल्याने सर्वांना थक्क केले.
पहिल्याच प्रयत्नात द्वितीय क्रमांक पटकावत तिने सिद्ध केलं की खरी देवीस्वरूप शक्ती आजच्या नव्या पिढीत आहे. मैदानावरील तिच्या अचूक लक्ष्यभेदाने प्रेक्षकापासून समालोचकांपर्यंत सार्यांचेच लक्ष वेधून घेतले. पुण्यातील राज्यस्तरीय स्पर्धेत चारशे पन्नास प्रतिस्पर्ध्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवणे ही तिच्या जिद्दीची साक्ष आहे. तसेच जिल्हा व राज्य पातळीवरील सलग सुवर्ण आणि रौप्यपदके मिळवणे हे सगळे तिच्या मेहनतीच आणि आत्मविश्वासाचे उदाहरण आहे. काही खेळ समीक्षकांनी तिच्या खेळाविषयी मत व्यक्त करताना स्पष्टपणे म्हटले की, ही मुलगी भारतीय धनुर्विद्येत उद्याची राष्ट्रीय विजेती ठरू शकते.
नवरात्रोत्सवाच्या दिवसांत देवीच्या शक्तीचं स्मरण प्रत्येकाला होतं, पण तनिषासारख्या मुली त्या शक्तीचं वास्तव रूप बनतात. खेळासारख्या परंपरेने पुरुषप्रधान क्षेत्रात तिने चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रखर इच्छाशक्तीच्या जोरावर यश मिळवलं. रायगड जिल्ह्यात इनडोअर स्टेडियमचं अभाव असूनही, सरावासाठी पुरेशा सुविधा नसतानाही तिने हार मानली नाही. तनिषाचे वडील मंदार वर्तक हे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, त्यांना खेळात असणारी आवड त्यांनी मुलीमध्ये पाहिली आहे म्हणून तनिषाची आई मीरा वर्तक यांच्या साथीने तनिषाला मानसिक बळ आणि सततचं प्रोत्साहन देऊन ते दोघे मायबाप या मुलीला वेगळ्या प्रकारे घडवित आहेत.
सेंट मेरी अलिबाग शाळेत शिक्षण घेत असताना तनिषाने खेळ आणि अभ्यासाचा उत्तम तोल साधला. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि बावलेकर आर्चरी अकादमीतील प्रशिक्षक संतोष जाधव यांचा सातत्यपूर्ण सराव यामुळे तिच्या खेळात सातत्य राहिले. जिल्हास्तरावर सुवर्ण, राज्यस्तरावर रौप्य व कांस्य, तर राष्ट्रीय पातळीवर सुवर्णासह इतर पदकं पटकावत तिने उज्ज्वल यश मिळवलं, त्याचबरोबर अभ्यासात पहिल्या तिघांत स्थान, वाचनाची आवड, दहीहंडी सारख्या पारंपरिक खेळात सहभाग आणि कॅम्पिंगमध्ये बेस्ट कॅम्पर ठरणे - या सगळ्यांनी तिचं व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध झालं. नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय डिफेन्स अकॅडमी स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावून तिने आपली ताकद पुन्हा सिद्ध केली.
पॅरिस येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत 32 खेळांमध्ये जगभरातील हजारो खेळाडू सहभागी झाले होते पण आपल्या देशाचा विचार करताना आपण केवळ 15-16 प्रकारात सहभागी झालो आणि आपल्या मेडलची संख्या होती मोजून 6. याचे कारण आपण सर्वजण जाणतो. त्यामुळे आपल्याला यावर मात करण्यासाठी ग्रामीण भागातून येणार्या अशा खेळाडूंकडे लक्ष द्यावे लागणार आहे तेव्हाच उद्याची मेरीकोम आपल्याला भेटेल, नागावसारख्या छोट्याशा गावातून उगवलेली ही कन्या संपूर्ण महाराष्ट्रातील मुलींना प्रेरणा देणारी आहे. तिचं यश म्हणजे फक्त एक पदक नव्हे, तर श्रीशक्तीच्या नव्या युगाची घोषणा आहे. नवरात्रीत देवीची आराधना करताना आपण तनिषासारख्या कन्यांचाही सन्मान केला पाहिजे. कारण या मुलीच उद्या आपल्या समाजाला आणि देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्ती मिळवून देणार आहेत.
आज बहुतेक आई-वडील आपल्या मुलांना डॉक्टर किंवा इंजिनियर बनवण्याचाच विचार करतात, पण तनिषाचे आई-बाबा वेगळं उदाहरण घालून देतात. त्यांनी दाखवून दिलं की खेळातूनही उज्ज्वल करिअर घडू शकतं आणि मुलांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात चमकावं, हीच खरी पालकांची भूमिका आहे. तनिषाच्या यशातून तिचे पालक इतरांना मार्गदर्शन करत आहेत की मुलांच्या आवडीला पाठिंबा दिला, तर ते कोणत्याही क्षेत्रात राज्य, देश आणि जगाचा मान वाढवू शकतात.
सेंट मेरी अलिबाग शाळेत शिक्षण घेत असताना तनिषाने खेळ आणि अभ्यासाचा उत्तम तोल साधला. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि बावलेकर आर्चरी अकादमीतील प्रशिक्षक संतोष जाधव यांचा सातत्यपूर्ण सराव यामुळे तिच्या खेळात सातत्य राहिले. जिल्हास्तरावर सुवर्ण, राज्यस्तरावर रौप्य व कांस्य, तर राष्ट्रीय पातळीवर सुवर्णासह इतर पदकं पटकावत तिने उज्ज्वल यश मिळवलं, त्याचबरोबर अभ्यासात पहिल्या तिघांत स्थान, वाचनाची आवड, दहीहंडी सारख्या पारंपरिक खेळात सहभाग आणि कॅम्पिंगमध्ये बेस्ट कॅम्पर ठरणे - या सगळ्यांनी तिचं व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध झालं. नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय डिफेन्स अकॅडमी स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावून तिने आपली ताकद पुन्हा सिद्ध केली.