माणगाव : कमलाकर होवाळ
माणगाव-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाट रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यांतील कोंडेथर गावच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण दुर्घटनेत थार कार दरीत कोसळून पुण्यातील सहा तरुण पर्यटकांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूची घटना गुरुवारी समोर आली.
दोन दिवसांच्या गुगल मॅप शोधानंतर वाहनाचा ठावठिकाणा लागला आणि या घाट रस्त्यावरील धोके किती प्राणघातक आहेत, हे पून्हा एकदा अधोरेखीत झाले. या मार्गाने प्रवास करणाऱ्या पर्यटकांमध्ये आणि नागरिकांमध्ये आता प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तीव्र उताराचा रस्ता, रस्त्याचा अंदाज न येणारी वळणे, खोल दऱ्यांच्या बाजूला नसलेल्या संरक्षक भींती या सर्व कारणास्तव ताम्हिणी घाटातील प्रवास अत्यंत धोकादायक बनला आहे. दिवसेंदिवस ताम्हिणी घाट मार्ग मृत्यूचा मार्ग बनला असल्याची भावना प्रवासी आणि येथील स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
पुणे आणि कोकणाला जोडणारा हा राज्यातील एक महत्त्वाचा आणि सतत गजबजलेला घाटमार्ग आहे.दिघी आंतरराष्ट्रीय बंदराला जोडणी मिळाल्याने या महामार्गाचे महत्त्व गेल्या काही वर्षात अधिक वाढले. मात्र, ज्या वेगाने वाहतूक आणि पर्यटन वाढले त्याच वेगाने रस्त्याची संरचना, रुंदीकरण आणि सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत हे यापूर्वी झालेल्या अपघातांच्या निमीत्ताने अनेकदा समोर आले आहे.
प्रवास सुरक्षित कधी होणार
ताम्हिणी घाटातील प्रवास सुरक्षित कधी होणार ? हा प्रश्न या मार्गावरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांना भेडसावत आहे. थार कार दरीत कोसळून सहा तरुणांचा मृत्यू हा अपघात केवळ एक दुर्घटना नाही, तर अपुऱ्या उपाययोजना, दुर्लक्षलेली सुरक्षा आणि वारंवार दिलेल्या पण वास्तवात न आलेल्या आश्वासनांचा परिणाम आहे. या दुर्घटनेमुळे शासन, प्रशासन आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने गंभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.