Tamhini Ghat Road Accidents Pudhari
रायगड

Tamhini Ghat Road Accidents: नागमोडी ताम्हिणी घाट की मृत्यूचा सापळा? तीन वर्षांत ९५ अपघातांत ३९ जणांचा मृत्यू, १७५ जखमी

वळणांवर काळ बनून उभ्या खोल दऱ्या

पुढारी वृत्तसेवा

अरुण पवार

माणगाव: सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगा, धुक्याची चादर, खळाळणारे धबधबे आणि निसर्गाचे मनमोहक सौंदर्य यामुळे ताम्हिणी घाट पर्यटकांचे विशेष आकर्षण बनला आहे. मात्र याच निसर्गरम्य घाटातील नागमोडी वळणे, खोल दऱ्या आणि धोकादायक चढ-उतार आता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर आव्हान ठरत आहेत.

निसर्गाचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांचा प्रवास सुखरूप व्हावा की अपघाताच्या रूपाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

उपलब्ध प्रसिद्ध आकडेवारीनुसार, २०२३ ते ऑक्टोबर २०२५ या तीन वर्षांच्या कालावधीत ताम्हिणी घाटात तब्बल ९५ अपघातांची नोंद झाली असून, त्यामध्ये ३९ जणांचा मृत्यू तर १७५ जण जखमी झाले आहेत. ही आकडेवारी केवळ संख्या नसून अनेक कुटुंबांच्या वेदना आणि आयुष्यभराची हानी दर्शविणारी आहे.

तीन वर्षांतील अपघातांची धक्कादायक आकडेवारी!

२०२३ मध्ये २१ अपघात झाले. त्यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला, तर ३० जण जखमी झाले. २०२४ मध्ये अपघातांची संख्या वाढून ३९ वर पोहोचली. या वर्षात १८ जणांना जीव गमवावा लागला, तर १०१ जण जखमी झाले. २०२५ मध्ये ऑक्टोबरअखेर ३५ अपघातांची नोंद झाली असून, १५ जणांचा मृत्यू आणि ४४ जण जखमी झाले.

एकूण तीन वर्षे : अपघात : ९५, मृत्यू : ३९, जखमी : १७५ असे आहेत. २०२४ मधील ३९ अपघात आणि १८ मृत्यू ही बाब विशेष चिंताजनक आहे. २०२५ मध्येही अपघातांचे प्रमाण कमी झालेले दिसत नाही. ताम्हिणी घाट हा केवळ पर्यटनाचा मार्ग नसून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे या मार्गावरील सुरक्षितता ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी ठरली पाहिजे.

अपघातानंतर मदतीला धावण्यापेक्षा अपघातच होऊ नयेत यासाठी उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. ३९ मृत्यूंची पुनरावृत्ती होऊ नये, एकाही कुटुंबाचा आधार हिरावला जाऊ नये आणि प्रत्येक प्रवासी सुखरूप घरी पोहोचावा, यासाठी ताम्हिणी घाटातील सुरक्षा व्यवस्थेला आता प्राधान्य देण्याची वेळ आली आहे!

खोल दऱ्या, तीव्र वळणे, अपुऱ्या सुरक्षा सुविधा

कोंडेथर, निवे परिसरासह घाटातील अनेक ठिकाणी तीव्र वळणे आणि खोल दऱ्या आहेत. काही ठिकाणी संरक्षक कठडे किंवा रेलिंगचा अभाव, अपुरे दिशादर्शक फलक आणि रात्रीच्या वेळी कमी प्रकाश यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. वेगात वाहन चालविणे, चुकीचे ओव्हरटेकिंग आणि आंधळ्या वळणांवरील निष्काळजीपणा अपघातांना निमंत्रण देऊ शकतो.

पावसाळ्यात धोका अधिकच वाढतो

पावसाळ्यात दाट धुके, निसरडे रस्ते, दरड कोसळणे आणि रस्ता खचण्याच्या घटना यामुळे प्रवास अधिक धोकादायक होतो. सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची गर्दी, वाहतूक कोंडी आणि रस्त्यावर बेशिस्तपणे उभी केलेली वाहने यांचाही वाहतुकीवर परिणाम होतो. 

नोव्हेंबर २०२५ मध्ये थार वाहन दरीत कोसळून सहा तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. नोव्हेंबर २०२६ मध्येही एका उद्योजकाच्या कारचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे घाटातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात

अपघातप्रवण ठिकाणांचे सर्वेक्षण करून धोकादायक वळणांवर मजबूत संरक्षक कठडे, रेलिंग, दिशादर्शक फलक आणि वेगमर्यादेचे फलक बसविणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी प्रकाशव्यवस्था, पावसाळ्यात दरडप्रवण भागांवर देखरेख, आपत्कालीन रुग्णवाहिका, क्रेन, मदत केंद्रांची उपलब्धता वाढवावी. पोलिसांनीही वाहतूक नियमांची अंमलबजावणी करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT