

नवी मुंबई: थंडीचा जोर वाढू लागल्याने फळांच्या बाजारपेठेत संत्र्याची मागणी वाढत असतानाच घाऊक बाजारातील दरात घसरण झाल्याचे चित्र आहे. संत्र्याची उपलब्धता आणि हंगामी आवक यामुळे गेल्या काही दिवसांत घाऊक दर खाली आले आहेत.
मात्र घाऊक बाजारातील दर कमी झाले असले, तरी किरकोळ बाजारात ग्राहकांना त्याचा पूर्ण फायदा मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
नवी मुंबईतील वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारात हिवाळी हंगामातील फळांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर होते. नागपूर, अमरावती व विदर्भातील विविध भागांतून येणाऱ्या संत्र्यांना बाजारपेठेत महत्त्वाचे स्थान आहे. किरकोळ फळ विक्रेते, ज्यूस सेंटर तसेच हॉटेल व्यावसायिकांकडून संत्र्याला मागणी असते.
मुंबई फळ बाजारात संत्र्याचा सर्वसाधारण घाऊक दर ८ हजार रुपये प्रतिक्विंटल होता. त्यानंतर २१ नोव्हेंबरला हा दर ५,५०० रुपये तर २३ नोव्हेंबरला ५ हजार रुपयांवर आला. २४ नोव्हेंबर रोजी दरात किंचित वाढ होऊन तो ५,५०० रुपये प्रतिक्विंटल झाला. म्हणजेच सध्याचा घाऊक दर किलोमागे सुमारे ५५ रुपये आहे.
१९ नोव्हेंबरच्या तुलनेत पाच दिवसांत घाऊक दरात सुमारे ३१ टक्क्यांची घट झाली आहे. मात्र किरकोळ बाजारातील चित्र काहीसे वेगळे आहे. किरकोळ बाजारात संत्र्याची विक्री साधारण ५५ ते ७० रुपये प्रतिकिलो दराने होत आहे.
काही ठिकाणी दर्जेदार संत्र्यांसाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे घाऊक बाजारात किलोमागे ५५ रुपये दर असताना किरकोळ बाजारात ७० रुपयांपर्यंत दर आकारले जात असल्याने ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडत आहे. वाहतूक, हाताळणी, प्रतवारी व विक्रेत्यांचा नफा यामुळे किरकोळ दरात फरक पडत असला तरी घाऊक दरातील घसरणीचा फायदा ग्राहकांना मिळणे अपेक्षित आहे.
सध्या संत्र्याचे किमान घाऊक दर ४० रुपये, तर कमाल दर ७० रुपये प्रतिकिलो आहेत. दर्जा, आकार व गुणवत्तेनुसार दरांमध्ये फरक पडत आहे. हिवाळ्यात संत्र्याला असलेली मागणी लक्षात घेता आगामी काळात आवक वाढल्यास दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र घाऊक बाजारातील दरातील घसरण किरकोळ बाजारातही प्रतिबिंबित झाल्यास सर्वसामान्य ग्राहकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळू शकतो.