ताम्हिणी घाटात मृत्यूची धोकादायक वळणे pudhari photo
रायगड

Tamhini Ghat : ताम्हिणी घाटात मृत्यूची धोकादायक वळणे

माणगाव-विळे रुंदीकरण न झाल्याने अपघातांत दुपटीने वाढ; रस्ते विकास महामंडळाचे दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

माणगाव : कमलाकर होवाळ

माणगाव तालुक्यातील निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या आणि पर्यटकांना भुरळ घालणार्‍या ताम्हिणी घाटात तीव्र उतार आणि चढाईचा अवघड वळणांचा मोठा घाटरस्ता आहे. ताम्हिणी या घाटात पुरेसे संरक्षण कठडे आणि संरक्षक भिंतींचे कवच नसल्याने धोकादायक वळणांवर वारंवार अनेक वेळा जीवघेणे अपघात होत आहेत. तसेच माणगाव ते विळे औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक कारखान्यांच्या 20 कि. मी. परिसरापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण न झाल्याने अपघातांत दुपटीने वाढ झालेली आहे.

येथील औद्योगिक प्रकल्पांमधून मोठमोठी अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे पर्यटकांना आणि प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. याबाबत रस्ते विकास महामंडळ अनभिज्ञ असून काहीच कारवाई करताना दिसत नाही.

माणगाव ते विळे आणि विळे ते पुणे या महामार्गावर दिवसेंदिवस रहदारी वाढत आहे. त्यामुळे दररोज अपघात होऊन अनेक नाहक बळी जात आहेत. दिघी बंदर ते पुणे या महामार्गावरील दिघी ते माणगाव आणि विळे ते पुणे हा महामार्ग पूर्ण झाला आहे. मात्र माणगाव ते विळे हा महामार्ग रुंदीकरण न झाल्याने त्यांचे दुपदरीकरण अद्याप झालेले नाही.

हा भाग दुर्गम आणि डोंगराळ आहे. या महामार्गावर देखील अवघड वळणे आहेत. तसेच हा महामार्गाचे रुंदीकरण न झाल्याने नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. गेल्या पाच वर्षांत पाच पट अधिक रहदारी आणि पर्यटकांची संख्या वर्दळ वाढली आहे.

  • घाटात सुट्टीच्या दिवशी तरुणाई पुणे आणि मुंबई या शहरातून अवतरलेली असते. त्यांचा रस्त्यावरच राजरोसपणे धांगडधिंगा सुरू असतो. त्यातील बहुतांश मद्यधुंद अवस्थेत असतात. या बेधुंदपणे नाचणार्‍या तरुणांना आवरण्यासाठी पुरेसे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येत नसल्याने नेहमीच हाणामारी होत असतात. त्यामुळे काही वेळा घाटात वाहतूक कोंडी होत असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT