रायगडः पुणे-माणगाव मार्गावरील ताम्हिणी घाटातील रायगड पुणे सीमेवरील डोंगरवाडी गावाजवळ महाड औद्योगिक वसाहतीतून पूण्याला हायड्रोक्लोरिक अॅसिड घेवून जाणारा टँकर रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उलटला. या टँकरमधून अॅसीडच्या वाफा (अॅसिड फ्यूम्स) येवू लागल्याने धोकादायक प्रसंग निर्माण झाला होता. तत्काळ वाहतूक थांबविण्यात आली, परिणामी या मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या.
दरम्यान रायगड आणि पूणे पोलीस व सुरक्षा यंत्रणांनी घटनास्थळी पोहोचून गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरु केले. गळती पुर्णतः थांबल्यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घाटातील वाहतूक पूर्ववत सुरु झाली. ही माहिती रायगड जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाठक यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली आहे.
आज रविवारचा दिवस असल्याने पावसाळी पर्यटनासाठी पुण्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक ताम्हिणी घाट आणि रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारी जाण्याकरिता निघाले होते. परिणामी घाटात पर्यंटकांच्या वाहनांची वर्दळ मोठी होती. अशातच घाटात अॅसिडचा टँकर उलटल्याने एकच खळबळ उडाली. उलटलेल्या टॅँकर मधून अॅसिड गळती आणि अॅसीडच्या वाफा पसरत होत्या. दरम्यान या अपघातात कोणीही जखमी वा कोणालाही अॅसिडच्या वाफांचा त्रास झालेला नसल्याचे पोलिस सुत्रांनी सागितले. घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी व पोलीसांनी पोहोचून वाहतूक सुरळीत केली.
सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी घटनास्थळी पोहोचून, अॅसिड गळती ऱोखून आजूबाजूचा परिसर सुरक्षित करण्याची महत्वपूर्ण कामगीरी केली. दरम्यान रस्त्याच्या बाजूला उलटलेला टँकर बाहेर काढण्याचे काम रायगड व पूणे पोलिस यांच्या माध्यमातून करण्यात आले. संध्याकाळी चार वाजता वाहतूक पूर्ववत सुरु झाली आहे.