

माणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत ताम्हिणी घाटात लग्नाचे वह्राड घेऊन निघालेली खासगी बस पलटली. यामध्ये खासगी बसमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. रुग्णवाहिका तसेच रेस्क्यू टीम घटनास्थळावर दाखल झालेले असून मदतकार्य युध्द पातळीवर सुरू आहे. शुक्रवारी (दि २०) सकाळी १० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. बसमधील पाच प्रवासी बसखाली सापडून दगावले आहेत. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या अपघातात एकूण 25 प्रवासी जखमी झाले असून तीन प्रवासी गंभीर जखमी असल्याचे समोर येत आहे. हे वऱ्हाड विश्रांतवाडी येथून महाड या ठिकाणी लग्नकार्यानिमित्ताने चालले होते.
अपघातातील जखमींना त्वरित उपचार मिळावेत, यासाठी पोस्को कंपनीची रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. जखमी प्रवाशांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ताम्हिणी घाट वळणावळणाचा व उताराचा असल्याने येथे वेगात असलेल्या वाहनांच्या अपघातांची शक्यता जास्त असते. काही दिवसांपूर्वी या परिसरात शाळेच्या सहलीच्या बसचा देखील असाच अपघात झाला होता. माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.