Kashid Beach Swimming Ban Pudhari
रायगड

Kashid Beach Swimming Ban: काशिद समुद्र किनारी शुकशुकाट; पावसाळ्यात पर्यटकांना समुद्रात पोहण्यास बंदी

ग्रामपंचायतीकडून धोक्याचे फलक

पुढारी वृत्तसेवा

महेंद्र खैरे

रेवदंडा: मुरूड तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या काशिद समुद्र किनाऱ्यावर सध्या पावसाळ्यामुळे संपूर्ण शुकशुकाट पसरला आहे. वर्षभर पर्यटकांच्या गर्दीने गजबजून जाणारा हा समुद्रकिनारा सध्या ओस पडला असून, समुद्रातील धोकादायक लाटा आणि खराब हवामानामुळे काशिद ग्रामपंचायतीने पर्यटकांना समुद्रात पोहण्यास सक्त मनाई केली आहे. याबाबतचे इशारा फलक समुद्रकिनाऱ्यालगत विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत.

काशिद समुद्रकिनारा हा रायगड जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे. स्वच्छ पांढरी वाळू, निळाशार समुद्र, हिरव्यागार झाडीने वेढलेला परिसर आणि शांत वातावरणामुळे वर्षभर हजारो पर्यटक येथे भेट देतात. विशेषतः शनिवार-रविवार व सुट्ट्यांच्या काळात किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी असते.

मात्र पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने मोठ्या लाटा आणि वेगवान प्रवाहामुळे समुद्रात पोहणे अत्यंत धोकादायक ठरते. या पार्श्वभूमीवर काशिद ग्रामपंचायतीने १५ जून २०२६ पासून पावसाळा संपेपर्यंत समुद्रात पोहण्यास बंदी घालण्यात आली असून, किनाऱ्यावर धोक्याचे इशारा फलक लावून पर्यटकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

पर्यटकांची वर्दळ थांबल्याने समुद्रकिनाऱ्यालगत उभारलेले खाद्यपदार्थांचे स्टॉल, लहान-मोठी दुकाने तसेच इतर पर्यटन व्यवसायही बहुतांश बंद आहेत. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत अशीच परिस्थिती निर्माण होत असली तरी पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाचे स्थानिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना पावसाळ्याच्या काळात समुद्रकिनाऱ्यावर फिरताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे तसेच समुद्रात उतरण्याचा कोणताही प्रयत्न न करण्याचे आवाहन केले आहे. सध्या नेहमी पर्यटकांच्या गर्दीने गजबजणारा काशिद समुद्रकिनारा शांत आणि ओसाड दिसत असून, पर्यटन हंगाम पुन्हा सुरू होण्याची स्थानिकांना प्रतीक्षा लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT