Sudhagad flood pudhari photo
रायगड

Sudhagad flood : सुधागडात पुरामध्ये कोट्यवधींचे नुकसान, जनजीवन विस्कळीत

जांभूळपाडा, पेडली, नांदगावसह पालीला फटका

पुढारी वृत्तसेवा

पाली : संदेश उतेकर

सुधागड तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार कोसळधार पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. सतत पडणाऱ्या या पावसामुळे सुधागड तालुक्यातील अंबा आणि कुंडलिका या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडून रौद्र रूप धारण केले होते. या नद्यांचे पुराचे पाणी थेट पाली शहरासह जांभूळपाडा, पेडली, भेरव, नांदगाव आणि नदीकाठच्या अनेक गावांमध्ये शिरल्याने संपूर्ण तालुक्याला महापुराचा वेढा पडला होता. ६ जुलै रोजी ओढवलेल्या या नैसर्गिक संकटामुळे २४ जुलै १९८९ रोजी आलेल्या विनाशकारी महापुराच्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.

दुकानांचे अतोनात नुकसान

पाली शहरात आणि परिसरातील बाजारपेठांमध्ये अचानक पुराचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची व नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली. अनेक इमारतींना पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. शेकडो दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.अनेक चारचाकी व दोन चाकी वाहने पाण्याखाली बुडाली होती. प्रत्येक नागरिक आपली वाहने आणि दुकानातील वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी जीवाची बाजी लावून तारेवरची कसरत करत होता.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

"१९८९ साली आलेल्या महापुरात जशी भयानक परिस्थिती निर्माण झाली होती, तशीच पुनरावृत्ती होते की काय, या भीतीने काल रात्री सुधागडवासीयांची धाकधूक वाढवली होती. संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले होते."

पुरामुळे बेघर झालेल्या आणि अडकलेल्या नागरिकांसाठी पाली येथील श्री बल्लाळेश्वर मंदिराच्या भक्तनिवासात राहण्याची व जेवणाची तात्काळ व्यवस्था करण्यात आली. नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, सुधागड आपत्ती व्यवस्थापन समिती आणि पालीतील दानशूर सामाजिक कार्यकर्त्यांनी तात्काळ पूरग्रस्त भागाची पाहणी केली. प्रशासकीय यंत्रणा आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी मदत पुरवली.

वीजपुरवठा खंडित

एकीकडे पुराचे पाणी वाढत असतानाच, दुसरीकडे नागशेत, कोशिंबळे आणि धोंडसे भागात दरड कोसळल्याच्या घटना घडल्या. यामुळे या भागातील वाहतूक काहीकाळ पूर्णपणे ठप्प झाली. सुरक्षेचा उपाय म्हणून संपूर्ण सुधागड तालुक्यातील वीजपुरवठा प्रशासनाकडून बंद ठेवण्यात आला होता. महावितरणतर्फे दुरुस्ती करण्यात आली.

पूल पाण्याखाली

पुराच्या पाण्याचा जोर एवढा प्रचंड होता की पाली, भेरव, आणि नांदगाव येथील नद्यांवरील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. अनेक मुख्य मार्गांवर आणि रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे अनेक तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तालुक्याचा संपर्क इतर भागांशी तुटल्यामुळे नागरिक जागच्या जागी अडकून पडले होते.पूर ओसरल्यानंतर त्यांना सुखरुप आणले गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT