शरद निकुंभ
रायगड: सुधागडच्या चार दिशांना असलेली श्री विरेश्वर, श्री सिद्धेश्वर, श्री उत्तरेश्वर आणि श्री उद्धर रामेश्वर ही प्राचीन स्वयंभू शिवस्थाने भाविकांच्या श्रद्धेची प्रमुख केंद्रे मानली जातात. श्रावणी सोमवारनिमित्त येथे भाविकांच मोठी गर्दी असते.
विरेश्वर : वीरांना यश देणारे दैवत
पाली-पेडली परिसरातील श्री विरेश्वर मंदिर हे सुधागडच्या धार्मिक वैभवातील महत्त्वाचे स्थान आहे. पेडली गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेले हे मंदिर स्वयंभू शिवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.
हेमाडपंती स्थापत्यशैलीची छाप असलेल्या या प्राचीन मंदिराचा इतिहास शेकडो वर्षांचा असल्याचे सांगितले जाते. वीरांना यश देणारा ‘वीरांचा ईश्वर’ म्हणून या देवास विरेश्वर हे नाव प्राप्त झाल्याची स्थानिक आख्यायिका आहे.
निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटेपासूनच अभिषेक व दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. मनोकामना पूर्ण होण्यासाठी तसेच विविध व्याधींपासून मुक्ती मिळावी, यासाठी भाविक येथे श्रद्धेने प्रार्थना करतात.
सिद्धेश्वर : जागृत शिवस्थान
पालीपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेले श्री सिद्धेश्वर मंदिर हे प्राचीन आणि प्रसिद्ध शिवस्थान आहे. सुधागड परिसरातील भाविकांसाठी हे मंदिर श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिर परिसरात विशेष पूजा, अभिषेक आणि धार्मिक कार्यक्रम होत असून दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात.
उत्तरेश्वर : सह्याद्रीतील शिवधाम
सुधागड तालुक्याच्या उत्तरेकडील टोकाला असलेले फल्याण गाव आपल्या निसर्गसौंदर्यासोबतच श्री उत्तरेश्वर या प्राचीन शिवस्थानामुळेही प्रसिद्ध आहे. जांभुळपाड्यापासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर फल्याण गावाजवळ सह्याद्रीच्या उत्तुंग पर्वतरांगांच्या सान्निध्यात हे मंदिर आहे.
वनराईने नटलेल्या परिसरातील जुन्या लाकडी रचनेच्या मंदिरात श्री उत्तरेश्वराचे पवित्र शिवलिंग विराजमान आहे. मंदिरातील भव्य नंदीही भाविकांचे लक्ष वेधून घेतो. महाशिवरात्रीला डोंगर-दऱ्यांतून, गावागावांतून भाविक येथे दर्शनासाठी दाखल होतात. निसर्ग आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम या ठिकाणी अनुभवायला मिळतो.
उद्धर रामेश्वर
सुधागडच्या धार्मिक परंपरेतील आणखी एक महत्त्वाचे स्थान म्हणजे श्री उद्धर रामेश्वर. या मंदिराचा संबंध प्रभू श्रीराम आणि जटायू यांच्या पुराणकथेशी जोडला जातो. सीतेच्या शोधासाठी दक्षिणेकडे जात असताना प्रभू श्रीरामांना रावणाशी झालेल्या युद्धात गंभीर जखमी झालेला जटायू आढळला.
सीतेचे रक्षण करताना रावणाने जटायूचे पंख छाटले होते. प्रभू श्रीरामांनी त्याला मोक्ष प्राप्त करून दिला, अशी आख्यायिका सांगितली जाते. श्रीरामाच्या परमेश्वरी स्पर्शाने जटायूचा उद्धार झाल्याच्या या कथेशी संबंधित असलेले हे तीर्थस्थान भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र बनले आहे. येथे असलेले प्राचीन रामेश्वर मंदिर महाशिवरात्रीला विशेष भक्तिभावाने उजळून निघते.
चारधामांबरोबरच पाली शहरातील श्री केदारेश्वर आणि श्री हटाळेश्वर ही प्राचीन शिवमंदिरेही महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांनी गजबजून जातात.
धार्मिक पर्यटनाची अनोखी पर्वणी
सुधागडचा हा ‘चार धाम’ प्रवास केवळ धार्मिक श्रद्धेपुरता मर्यादित नसून सह्याद्रीच्या निसर्गसौंदर्याचा अनुभव देणारा आहे. चारही दिशांना विखुरलेली ही प्राचीन शिवस्थाने सुधागडच्या समृद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाची साक्ष देतात. श्रावणी सोमवार निमित्ताने या शिवधामांमध्ये होणारी भाविकांची गर्दी होते. सुधागडला धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळक स्थान मिळण्याची क्षमता असल्याचे दिसून येते.