Panvel Stray dog attack file photo
रायगड

Panvel Stray dog attack: कामोठ्यात भटक्या कुत्र्याची दहशत; १० जणांवर हल्ला, आजीच्या डोळ्याचा लचका तोडला

कामोठे सेक्टर १० परिसरात एका भटक्या कुत्र्याने अक्षरशः दहशत माजवत सुमारे दहा नागरिकांवर हल्ला चढविला.

पुढारी वृत्तसेवा

Panvel Stray dog attack

पनवेल : विक्रम बाबर

कामोठे सेक्टर १० परिसरात एका भटक्या कुत्र्याने अक्षरशः दहशत माजवत सुमारे दहा नागरिकांवर हल्ला चढवला. या थरारक घटनेत एका वृद्ध महिलेच्या डोळ्याजवळील मांसाचा लचका तोडला, तर लहान मुलांना वाचवण्यासाठी धावलेल्या ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिक कृष्णा म्हात्रे यांच्या हातालाही चावा घेतला. या सलग हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पनवेल महानगरपालिकेने तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाचे नेते राकेश गोवारी यांनी केली आहे.

भटक्या कुत्र्याने रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करत चावा घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी काही लहान मुलेही त्या परिसरातून जात होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिक कृष्णा म्हात्रे यांनी मोठे धाडस दाखवत मुलांना कुत्र्याच्या हल्ल्यापासून सुरक्षित बाजूला केले. मात्र, या प्रयत्नात कुत्र्याने त्यांच्या हाताला चावा घेतल्याने ते जखमी झाले. त्यासोबत सेक्टर १० येथील बैठक हॉल जवळून जाणाऱ्या एका आजीवर कुत्र्याने भ्याड हल्ला चढवला. यात कुत्र्याने एका आजीच्या उजव्या डोळ्याचा लचका तोडला आहे, त्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहे.

जवळपास दहा नागरिक या हल्ल्यात जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून वावरताना धास्ती वाटत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. कामोठ्यात यापूर्वी देखील अशाच भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुरडे जखमी झाले होते. जवळपास तीन ते चार घटना यापूर्वी घडल्या आहेत.

दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) नेते राकेश गोवारी यांनी या घटनेची गंभीर दखल घेत पनवेल महानगरपालिकेने संबंधित भटक्या कुत्र्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कामोठे परिसरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव वारंवार समोर येत असून, यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे पनवेल महानगरपालिकेने तातडीने प्रभावी उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT