Sri Vankhnath Temple, Nagaon is a fine example of architecture
रेवदंडा : महेंद्र खैरे
आंग्रेकालीन अष्टागरातील अनेक प्रसिध्द मंदिरे आजही पहावयास मिळतात, नागावच्या खारगल्ली नजीकचे श्री वंखनाथ मंदिर त्यापैकीच एक आहे.
अलिबागहून चौलकडे जाताना, अगदीच १० कि. मी. अंतरावर मुख्यः रस्त्यालगत हे मंदिर आहे. निसर्गरम्य सानिध्यात वसलेले मंदिर प्रथमदर्शनी फारसे जुने वाटत नाही, मात्र निट निरीक्षण केल्यास हे मंदिर बांधकाम जुने असल्याचे निदर्शनास येते. विशेष म्हणजे श्री वंखनाथ मंदिर मंदिरासमोरील पुष्करणी फारच सुंदर व आकर्षक आहे.
साधारतः ५० फुट लांब व तेव्हढयाच रुंदीच्या चौकोनी आकारातील या पुष्करणीचे काम काळ्या घडीव दगडांमध्ये केलेले आहे, पाण्याची पातळी कमी असताना, यातील सुंदर कोरीव काम पहाताना मन मोहरून जाते. या पुष्करणीच्या चारही बाजूना कोष्टकांमध्ये नक्षीकाम दिसते, ते पहाण्यासारखे आहे. हे ठिकाण पर्यटनासाठी उपयुक्त आहे. सरकारने या परिसराचा विकास केला तर निश्चितच पर्यटकांची पावले या मंदिराकडे वळतील.
शिवमंदिरात कुचीतच अशी कृष्ण पिसे पहावयास मिळतात. प्रवेशव्दाराजवळ जमिनीवरील दगडात सुंदर कोरीव काम केलेले आहे. गाभार्याच्या आत शिवलिंग आहे. त्यावर सोनेरी साज चढविलेला आहे. शिवलिंगाच्या मागे पार्वतीची मूर्ती दिसते. बाहेरून मंदिराकडे पाहिल्यास दोन सभामंडपावर व एक गर्भगृहाच्या घुमटावरील असे मंदिराचे तिन कळस दिसतात.
या मंदिराबाबत अजून एक वैशिष्ट पुर्ण बाब म्हणजे येथील घुमटावरील कमळाच्या पाकळयांमध्ये नक्षीकामाजवळ आहिल्याबाईच्या चेहर्याचे शिल्प कोरले आहे. ते शिल्प मंदिराच्या समोरील व मागील बाजूस कोरलेले आहे. थोडया दुरूत कळसाच्या थोडे खाली पाहिल्यास हे शिल्प पहाता येते. बाहेरील चौथऱ्यावर नक्षीकाम या मंदिराच्या कलात्मकतेत अजूनही भर घालते. पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी या मंदिराला आवर्जून भेट देउन स्थापत्य कलेची पाहणी करावी.