Suke kolambi price hike Pudhari
रायगड

Suke kolambi price hike: कोळंबी सोडे रस्सा आता फक्त श्रीमंतांसाठी; वाढत्या मागणीमुळे दर गगनाला

प्रति किलोचा दर 1800 ते 2000 रुपये

पुढारी वृत्तसेवा

महेंद्र खैरे

रेवदंडा: कोकणातील पारंपरिक आणि खवय्यांच्या विशेष पसंतीचा पदार्थ असलेल्या सुके कोळंबी सोडे रस्स्याचे दर सध्या गगनाला भिडले असून, किलोमागे 1800 ते 2000 रुपये असा भाव मिळत आहे. त्यामुळे ‌‘सुके कोळंबी सोडे रस्सा आता फक्त श्रीमंतांसाठीच राहिला आहे,‌’ अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.

रेवदंडा परिसरातील मच्छी मार्केटमध्ये सुके कोळंबी सोडे खरेदीसाठी स्थानिकांसह मुंबई, पुणे, ठाणे येथील चाकरमानी, पर्यटक व पै-पाहुण्यांची मोठी गर्दी होत आहे.

तिखट, झणझणीत मसाल्यात बनवलेला बटाटा घालून तयार केलेला सुके कोळंबी सोडे रस्सा हा अनेकांच्या खास आवडीचा पदार्थ मानला जातो. त्याच्या चविष्ट स्वादामुळे जेवताना चार घास अधिक खाल्ले जातात, असे खवय्ये सांगतात.

मोठ्या कोळंबीपासून तयार करण्यात येणारे हे सोडे बनवण्यासाठी कोळी बांधव व भगिनींना विशेष मेहनत घ्यावी लागते. समुद्रातून मिळालेली मोठी कोळंबी स्वच्छ करून पारंपरिक पद्धतीने उन्हात सुकवून सोडे तयार केले जातात. मात्र बाजारात यांना मोठी मागणी आणि चांगला दर मिळत असल्याने अनेक मच्छी व्यावसायिक आता सुके कोळंबी सोडे तयार करण्याकडे अधिक लक्ष देत आहेत.

दरम्यान, आग्राव, थेरोंडा, कोर्लई परिसरातील सुकी मच्छी व्यावसायिकांनी सांगितले की, दर वाढूनही सुके कोळंबी सोडे खरेदीची मागणी कमी झालेली नाही. विशेषतः सणासुदीच्या काळात आणि सुट्टीच्या हंगामात पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याने बाजारात सुके कोळंबी सोड्यांना चांगली उठाव मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT