

पोलादपूर: राज्यात पाणीटंचाई पाचवीला पुजलेली असते यावर मात करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार सह इतर अनेक योजना आणल्या आहेत. यापैकी काही योजना चांगल्या पद्धतीने राबविण्यात आल्याने गावातील पाणी प्रश्न मार्गी लागण्याची चर्चा,प्रसिद्धी पत्रकाद्वारे ऐकण्यात वाचण्यात आल्या असे असले तरी ग्रामीण भागातील नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत गावागावात समाज मंदिरांच्या बरोबरीने जलमंदिर, बंधाऱ्यांच्या विकासकामांसाठी व त्या तातडीने मंजुरी करत बांधण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, जेणेकरून वर्षभर पाणी उपलब्ध होईल व पाण्याची बचत होऊन पाणी टंचाईवर मात करणे सुलभ होणार आहे.
सिंचन क्षेत्रात वाढ झाल्यास पुन्हा शेती व्यवसायाला चालना मिळाल्यास इतर कामाची पूर्तता करणे शक्य होणार आहे, नुकतेच राज्याचे रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी पोलादपूरातील देवळे धरणाच्या दुरुस्ती कामाची पाहणी करत जलदगतीने धरणाचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
देशात राज्यात असणाऱ्या धरणांमुळे कोट्यवधी नागरिकांच्या पिण्याचे पाणी व ग्रामीण भागात सिंचनाच्या माध्यमातून अन्नधान्याची सोय झाल्याने त्यांना जलमंदिर म्हटले जाते. महाराष्ट्रात ब्रिटिश राजवटीत बांधलेली शंभर वर्षांपूर्वीची धरणे अजूनही सुस्थितीत आहेत, पण त्यानंतरच्या काळात बांधलेल्या धरणांना अगदी कमी आयुर्मानातच ‘घरघर’ लागली आहे.
पुराच्या पाण्याच्या सोबत वर्षानुवर्षे वाहून येणारा गाळ आणि धरण उभारणीमधील त्रुटींमुळे पाणी गळती वाढली असून, यामुळे धरणांचा उपयुक्त साठा काही टक्क्यांनी कमी झाला आहे. या वर मात करण्यासाठी धरणातील गाळ काढत त्यातील लिकेज काढणे क्रमप्राप्त आहे.
पोलादपूरातील देवळे धरण पावसाळ्या पूर्ण पणे भरते मात्र लिकेज असल्याने उन्हाळच्या दिवसात कोरडे पडत असल्याने देवळे, करंजे, नाणेघोळ, पितळवाडी, चाळीचा कोंड, वाकण, घागरकोंड अशा डोंगराळ भागातील गावांमध्ये अनेक वर्षांपासून पाण्याचा तीव्र तुटवडा भासत होता.साखळी बंधारे, नदीवरची जल मंदिरे गावागावात तयार झाली पाहिजेत. छोट्या नदीवरील बंधारे दहा ते पंधरा मीटर हे सहा ते दहा लाखांमध्ये होतात.
विशेषतः उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. शेतीसाठी देखील पाणी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुसान होत होते.या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी देवळे धरण प्रकल्प दुरुस्ती अंतर्गत नव्याने राबविण्यात येत आहे. या धरणामुळे नदीकाठी असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींचे बळकटीकरण होणार असून पाणी साठवण क्षमता वाढेल.
बंधाऱ्यांसह धरणांची कामे मार्गी लागणे गरजेचे
संपूर्ण परिसरातील सुमारे 10 ते 15 गावांना याचा थेट लाभ मिळणार आहे. त्याच प्रमाणे तालुक्यातील इतर धरणांना गती देण्यासाठी शासनाने मागील वर्षी धारवली काळवली प्रकल्प बाबत चर्चा करत गती देण्यासाठी कार्यवाही केली होती मात्र या बाबत गाढा अद्याप पुढे सरकला नसल्याने तालुक्यातील इतर बंधारेसह धरणाची कामे मार्गी लागणे गरजेचे बनले आहे.
मध्यम नदीवरचे बंधारे 30 ते 40 मीटर 15 ते 20 लाखाच्या दरम्यान होतात. आणि मोठी नदी सावित्री यासारख्या नद्यांवरील बंधारे 80 ते 100 मीटर साधारण 40 ते 60 लाखांच्या आसपास होतात. जसे आपण देवळांसाठी निधी उभारतो त्याच पद्धतीने सरकारवर अवलंबून न राहता आपण आपल्या नदीवरील साखळी बंधाऱ्यांसाठी निधी उभारला तर कोकणातील प्रत्येक गाव जलसमृद्ध होईल आणि या पाण्याचा जर आपण शेतीसाठी किंवा उद्योगांसाठी नीट उपयोग केला तर प्रत्येक गाव हे आर्थिक समृद्ध होईल.