Panvel News Pudhari
रायगड

Panvel News: पश्चिम बंगालप्रमाणे महाराष्ट्रातून 50 लाख घुसखोर बांगलादेशी बाद होणार: किरीट सोमैय्या

एसआयआर प्रक्रियेतून अचूक मतदार यादीचा निर्धार

पुढारी वृत्तसेवा

कळंबोली/पनवेल: भारतीय निवडणूक आयगाच्या वतीने ‌‘विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर)‌’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा उद्देश मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करणे हा आहे. या प्रक्रियेदरम्यान मृत, स्थलांतरित, डुप्लिकेट, बेकायदेशीर बांगलादेशी अपात्र मतदारांची नावे वगळण्याचे काम करण्यात येत आहे.

या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर नावे तपासण्यात आली असून पश्चिम बंगालमध्ये सुमारे 90 लाख घुसखोर बांगलादेशींची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील जवळपास 50 लाख बेकायदेशीर बांगलादेशींची नावे वगळण्याचा आग्रह निवडणूक आयोगाकडे करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार आणि या अभियानाचे प्रदेश संयोजक किरीट सोमेय्या यांनी आज पनवेल येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, सभागृहनेते ॲड. प्रकाश बिनेदार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच खारघर व आजूबाजूच्या परिसरामध्ये बंगलादेशींनी बेकायदेशीर खुसखोरी केली आहे. त्यामुळे याठिकाणी पाहणी करणार असून मुंब्रा कळवा या ठिकाणी खुसखोर बांगलादेशींचा शोध घेणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

भारताचे मूळ नसलेल्या लोकांचे नाव मतदार यादीत आहे पण पूर्ण इतिहासात नाही अशा लोकांचे नाव वगळण्याची प्रकिया देशाच्या अनुषंगाने महत्वाची आहे. त्यानुसार आता 20 एप्रिलपासून महाराष्ट्रात एसआयआर मोहीमचे काम सुरु होणार आहे. त्यामुळे घुसखोर मतदार यादीतून बाद होणार आहेत, असेही किरीट सोमय्या यांनी यावेळी स्पष्ट केले.

त्यांनी पत्रकारांशी संवाद करताना पुढे सांगितले कि, महाराष्ट्रात लवकरच भारतीय निवडणूक आयोग मार्फत मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष राज्यभर संघटनात्मक पातळीवर व्यापक तयारी करत असून, प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट व्हावे यासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचे किरीट सोमैय्या यांनी यावेळी सांगितले.

पक्षांतर्गत स्तरावर या उपक्रमाला ‌‘मत शुद्धीकरण अभियान‌’ असे संबोधण्यात आले असून, यामागील उद्देश म्हणजे मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनवणे हा आहे. या प्रक्रियेत पात्र नागरिकांची नोंदणी सुनिश्चित करण्याबरोबरच, यादीतील त्रुटी दुरुस्त करणे आणि अपात्र नोंदी वगळणे यावर भर दिला जाणार आहे.

या अनुषंगाने, राज्यातील सुमारे एक लाख मतदान केंद्रांवर पक्षाचे कार्यकर्ते सक्रिय करण्यात येत आहेत. ‌‘पन्ना प्रमुख‌’ व्यवस्था बळकट करून प्रत्येक मतदाराशी प्रत्यक्ष संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एसआयआर उपक्रमांतर्गत सध्याच्या मतदार यादीची 2002 च्या मूळ यादीशी तुलना करण्यात आली असता सुमारे 20 टक्के जुळणी आढळून आली. ग्रामीण भागात हे प्रमाण 70 ते 80 टक्क्यांदरम्यान असताना, शहरी भागात ते सुमारे 50 टक्के आहे. या आकडेवारीच्या आधारे मतदार नोंदणी व पडताळणी प्रक्रियेला अधिक गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एसआयआर ही प्रक्रिया पात्र नागरिकांची नोंदणी सुनिश्चित करणारी असून, बेकायदेशीररीत्या समाविष्ट झालेल्या नावांची छाननी करून त्यांना वगळण्यासही मदत करेल. लोकशाही मजबूत करण्यासाठी अचूक आणि विश्वसनीय मतदार यादी ही अत्यावश्यक आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपापल्या क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदवून प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचावे आणि एसआयआर प्रक्रियेला यशस्वी बनवावे.
- किरीट सोमैय्या, माजी खासदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT