BLO Suspension Pudhari
रायगड

BLO Suspension: एसआयआरची गणनापत्रके झेरॉक्सच्या दुकानात! पाच बीएलओ निलंबित

खारघरमधील प्रकाराने खळबळ, गैरवापर झाल्याचा संशय

पुढारी वृत्तसेवा

पनवेल: विशेष सघन पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (SIR) मतदारांकडून भरून घेण्यात आलेल्या गणना पत्रकांच्या (Enumeration Form) अनधिकृत झेरॉक्सचा प्रकार खारघर सेक्टर १९ येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाच बीएलओंना निलंबित केल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी दिली.

खारघर सेक्टर १९ येथील एका झेरॉक्स दुकानात एसआयआरच्या गणना पत्रकांचे गठ्ठे आढळून आल्याची तक्रार करण्यात आली होती.

२७ ऑगस्ट रोजी निवडणूक विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी पनवेलचे नायब तहसीलदार सुनिल किसन जाधव यांना कार्यवाहीचे आदेश देण्यात आले. त्यानुसार महसूल विभागातील अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पंचांच्या उपस्थितीत खारघर पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांकडे जमा असलेल्या गणना पत्रकांची पाहणी करण्यात आली.

पोलिसांकडे जमा असलेल्या गणना पत्रकांची

महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता, ती विशेष सघन पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारांनी भरलेली गणना पत्रके असल्याचे प्रथमदर्शनी आढळले.

या अर्जांवर मतदारांचे रंगीत फोटो, संबंधित यादी

भागातील बीएलओची स्वाक्षरी आणि आवश्यक माहिती भरलेली असल्याचे निदर्शनास आले. शिवसेना (उबाठा) पनवेल महानगरप्रमुख ॲड. समाधान काशीद यांनी याबाबत पोलिसांकडे पत्र देऊन गणना पत्रकांची अनधिकृत झेरॉक्स, चोरी व गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त केला होता.

कापडी पिशवीवर निवडणूक आयोगाचा लोगो

या तपासणीदरम्यान भारतीय निवडणूक आयोग (Election Commission of India) असा उल्लेख आणि निवडणूक आयोगाचा लोगो असलेली ‘Special Intensive Revision of Electoral Rolls’ अशी छपाई असलेली कापडी पिशवीही आढळून आली. या पिशवीवर १३८ आणि १४९ असे क्रमांक असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.

सूरज पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

दरम्यान, गणना पत्रके झेरॉक्स काढण्यासाठी घेऊन जाणाऱ्या सूरज पाटील यांच्यावर खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गणना पत्रकांची अनधिकृत हाताळणी, छायांकित प्रती काढणे तसेच शासकीय दस्तऐवजांच्या गोपनीयतेचा भंग केल्याच्या आरोपांबाबत पुढील तपास सुरू आहे.

गणना पत्रके झेरॉक्स दुकानापर्यंत कशी पोहोचली, ती कोणी उपलब्ध करून दिली, किती प्रती काढण्यात आल्या आणि या प्रतींचा नेमका वापर कशासाठी करण्यात आला, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

संवेदनशील दस्तऐवजांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत

या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या संवेदनशील दस्तऐवजांच्या सुरक्षिततेचा आणि गोपनीयतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणातील पोलिस तपास आणि निवडणूक विभागाची अंतर्गत चौकशी पूर्ण झाल्यानंतर गणना पत्रके बाहेर कशी गेली आणि त्यासाठी नेमकी कोणाची जबाबदारी होती, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

एसआयआरच्या गलथान कारभारावर शिक्कामोर्तब

देशभरात एसआयआर प्रक्रियेबाबत विविध आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. एसआयआर प्रक्रिया गांभीर्याने राबविली जात नसून बीएलओ घरोघरी जाऊन मोहीम न राबविता सोसायटी कार्यालयात, राजकीय घटकांनी उपलब्ध करुन दिलेल्या जागेत काम करत आहेत. राजकीय हेतूने नावे वगळली जात असल्याचा आरोपही केला जात आहे.

देशभरात मतदार याद्यांचे एसआयआर सुरू असून पनवेल विधानसभा मतदारसंघात ६ लाख ८४ हजार मतदारांपैकी सुमारे ४ लाख ३९५ मतदारांचे एसआयआर पूर्ण झाले आहे. सुमारे २ लाख ८३ हजार मतदारांचा अद्याप शोध लागलेला नाही. एसआयआर प्रक्रियेतील गलथान कारभारावर पनवेलमधील घटनेने शिक्कामोर्तब झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT