खांदा कॉलनी: रात्रीपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे सायन-पनवेल महामार्गाची मोठी दैना झाली आहे. महामार्गावरील उरण फाटा आणि नेरुळ परिसरातील सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने हा संपूर्ण परिसर जलमय झाला आहे.
रस्त्यावर पाणी भरल्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत असून, या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतुकीचा वेग कमालीचा मंदावला आहे.
पावसाचा जोर कायम असल्याने अनेक ठिकाणी रस्त्याला तलावाचे स्वरूप आले आहे. या साचलेल्या पाण्यातून वाहने अत्यंत सावधगिरीने मार्गक्रमण करताना दिसून येत आहेत. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे सकाळी घराबाहेर पडलेल्या नोकरदारांना, विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना तासनतास खोळंबून राहावे लागले.