खांदा कॉलनी : भरधाव कार दुभाजकावर आदळली आणि काही क्षणांतच आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण कारला वेढले! सायन-पनवेल महामार्गावर शनिवारी मध्यरात्री घडलेल्या या भीषण अपघातात तन्वी भल्ला (२९) या तरुणीचा मृत्यू झाला. आगीच्या विळख्यात कार पूर्णपणे जळून खाक झाली. कारमधील तिची मैत्रीण मात्र सुदैवाने बचावली. या दुर्घटनेचा व्हिडिओ समोर आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तन्वी भल्ला ही मैत्रिणीसोबत कारने खारघरच्या दिशेने जात होती. सायन-पनवेल महामार्गावरून जात असताना भरधाव कार अचानक रस्ता दुभाजकावर आदळली. धडक बसताच कारने पेट घेतला. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. कारमधील दोघींच्या जीवाला धोका निर्माण झाला.
या दुर्घटनेत तन्वीचा मृत्यू झाला, तर तिच्या मैत्रिणीने बचावण्यात यश मिळवले. अपघाताची माहिती मिळताच नेरुळ अग्निशमन केंद्राचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती.
अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये कार दुभाजकावर आदळल्यानंतर काही क्षणांतच आगीच्या ज्वाळांनी तिला वेढल्याचे दिसत आहे. दरम्यान, एल.पी. उड्डाणपुलावरून पुढे जायचे की सर्व्हिस रोडने मार्गक्रमण करायचे, याबाबत चालकाचा गोंधळ झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.