Nitesh Rane News Pudhari
रायगड

Water Transport: चिपी विमानतळाजवळ जेट्टीमार्गे गोव्यापर्यंत जलवाहतूक सुरू होणार; पर्यटनालमिळणार मोठी चालना

नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील बैठकीत प्रशासनाकडून प्रस्ताव सादर;

पुढारी वृत्तसेवा

रायगड: कोकण ते मुंबई ही बोट सेवा सुरू झाल्यानंतर काही दिवसातच काही तांत्रिक अडचणीमुळे बंद पडली. मात्र आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चीपी विमानतळाला चालना मिळावी आणि हे विमानतळ थेट गोव्याशी जोडले जावं यासाठी नव्या जेट्टीमार्गाचा जलवाहतुकीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण प्रस्ताव प्रशासनाकडून सादर करण्यात आला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून थेट गोवा अशी जलवाहतूक सुरू होण्याच्या आशा पल्लवी झाल्या आहेत. जिल्ह्यातील पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.

या बैठकीत कॉन्टिनेंटल इंटरलिंक प्राइव्हेट लिमिटेड आणि गोवा (जोइझ) कार रेंटल या कंपन्यांनी आपले प्रस्ताव सादर केले आहेत. चिपी ते गोवा जलवाहतूक प्रकल्प साकार झाल्यास सिंधुदुर्ग आणि गोवा या दोन प्रमुख पर्यटनस्थळांमधील संपर्क अधिक वेगवान आणि सुलभ होईल.

रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होण्याबरोबरच प्रवाशांचा वेळ वाचेल व अर्थव्यवस्थेलाही मोठा लाभ होणार आहे. या बैठकीस सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, कुलदीप सिंग मुख्य संचालक चिपी विमानतळ, कॉन्टिनेंटल इंटरलिंक प्राइव्हेट लिमिटेडचे विकास राजपूत व सतीश येरूंका तसेच गोवा (जोइझ) कार रेंटलचे नाथन वेगास उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुरू झालेली एक फेरी एप्रिल महिन्यातच तात्पुरत्या स्वरूपात बंद झाल्यानंतर आता आणखी एका जलवाहतूक मार्गाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. चिपी विमानतळाजवळ जेट्टीमार्गे गोव्यापर्यंत वाहतूक सुरू करण्याची योजना आहे.

कुठे असेल प्रस्तावित सेवा?

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या जेट्टीपासून थेट गोव्यातील जेट्टीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव या बैठकीत सादर करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन आणि वाहतूक सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने हे महत्त्वाचं मानलं जात आहे.

मंत्रालयात मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या दालनात बुधवारी झालेल्या बैठकीत सिंधुदुर्ग ते गोवा दरम्यानची वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ, जलद आणि पर्यटकांसाठी सोयीस्कर करण्यासाठी विविध पर्यायांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

मुंबई-विजयदुर्ग सेवा ठप्प

दरम्यान, मार्च महिन्यात मुंबई ते विजयदुर्ग रो-रो फेरी सुरू करण्यात आली होती. भाऊचा धक्का येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्गदरम्यान चालवली जाणारी ही रो-रो सेवा एका महिन्यातच बंद करण्यात आली. जहाजाच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळे ही सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली होती. सेवा सुरू झाल्यावरही महागड्या दरांमुळे नागरिकांनी याकडे पाठ फिरवली होती. अशी परिस्थिती असताच आणखी एका जलवाहतुकीच्या पर्यायाचा विचार सुरू झाला आहे. त्यामुळे हा पर्याय किती पट यशस्वी होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT