21 वनस्पतींची पत्री Pudhari
रायगड

Ganesh Puja : गणरायांना आवडे 21 वनस्पतींची पत्री, आयुर्वेदातील महत्त्व जाणून घ्या

Ganeshotsav 2025 | गणपतीला निसर्गरक्षक म्हणजे निसर्गाचे संरक्षण करणारी देवता म्हटले जाते

पुढारी वृत्तसेवा

Ganesh Chaturthi Traditional Worship

जयंत धुळप

रायगड: गणपतीला निसर्गरक्षक म्हणजे निसर्गाचे संरक्षण करणारी देवता म्हटले जाते. आणि म्हणूनच गणेशप्राणप्रतिष्ठापनेच्या वेळी गणपतीला 21 पत्री म्हणजे 21 विविध झाडांचे आणि वनस्पतींची पाने अर्पण करण्याची प्राचीन आणि अत्यंत पवित्र परंपरा आहे. 21 झाडांची ही पत्री निसर्गाचे प्रतिनिधित्व करते आणि या वनस्पतींमध्ये असलेले मानवाच्या आरोग्यासाठी उपयुक्त अशा आयुर्वेदिक गुणधर्मांना अधोरेखीत करते. रोगप्रतिकारक, शुद्धता आणि सकारात्मकता यांचे प्रतीक रुप म्हणजेच गणपतीला अर्पण करण्यात येणार्‍या या पत्रीच्या निमित्ताने मानवाला वृक्ष आणि निसर्ग संवर्धनाची आठवण करुन देणारी ही प्रथा आहे. आयुर्वेदिक, धार्मिक व पर्यावरणस्नेही उद्देशाने गणपतीस अर्पण केल्या जाणार्‍या या 21 पत्रीचे अनन्यसाधारण महत्व आपण जाणून घेणार आहोत.

१. दुर्वा

दुर्वा म्हणजेच हरळी ही गणपतीची अत्यंत आवडती गवत प्रजातीतील वनस्पती आहे. दुर्वा एक अत्यंत गुणकारी औषधी वनस्पती ,शीतलता देणारी, रक्त शुद्ध करणारी, त्वचेच्या समस्यांवर उपयुक्त आणि मूत्रविकारांवर गुणकारी आहे. दुर्वांमध्ये अँटीव्हायरल, अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असून, तिचा रस ताप कमी करण्यासाठी आणि शरीराला थंडावा देण्यासाठी वापरला जातो.

२.बेल

बेल हे एक अत्यंत औषधी गुणधर्म असलेले झाड आहे. त्याचे मूळ, पाने, साल, फळ आणि फुल या प्रत्येक भागाचा उपयोग विविध रोगांवर उपचार करण्यासाठी होतो. बेलामध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटीफंगल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात, ज्यामुळे ते पचनाच्या समस्या, ताप, सूज, मधुमेह आणि त्वचेचे विकार यांसारख्या आजारांवर अत्यंत प्रभावी आहे.

३.शमी

शमीचे अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत.पचनशक्ती सुधारणे, त्वचेचे विकार, श्वसनाचे विकार आणि ताप कमी करणे यासाठी याचा उपयोग होतो. हे दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे गुणधर्मांसाठी ओळखले जाते.पोटातील कृमी नष्ट करण्यासाठी शमीच्या पानांचा काढा उपयुक्त आहे. अपचनाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी याचा वापर केला जातो. जखमा भरण्यासाठी आणि त्वचेवरील पुरळ (skin eruptions) कमी करण्यासाठी शमीचा वापर होतो. श्वसनाचे विकार व शरीरातील ताप कमी करण्यासही हे मदत करते.

4.औदुंबर

औदुंबर हे औषधी झाड असून त्यांचा उपयोग अनेक आजारांवर केला जातो. या झाडाची पाने, फळे, फुले आणि साल हे विंचूदंश, गालगुंड, अतिसार, उचकी आणि अशक्तपणा या आजारांवर गुणकारी आहेत. औदुंबर वृक्षाला भारतीय संस्कृतीत धार्मिक महत्त्व आहे तर भारतीय आयुर्वेदात एक पवित्र वृक्ष तो मानला जातो.

5.अश्वत्थ-पिंपळ

अश्वत्थ अर्थात पिंपळ या झाडाला धार्मिक आणि औषधी महत्त्व आहे. या झाडाच्या साली, मुळे, पाने आणि फळे यांचा उपयोग खोकला, दमा, बद्धकोष्ठता, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रण आणि दातदुखी यांसारख्या विविध आजारांवर उपचारासाठी पारंपरिक भारतीय औषध पद्धतीमध्ये केला जातो.

6.आघाडा

आघाडा या वनस्पतीला काही भागात भारंगी असेही म्हटले जाते. ही एक अत्यंत महत्त्वाची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. श्वसनाशी संबंधित आजार, सर्दी, खोकला,नाकाची ऍलर्जी (ऍलर्जीक राहिनाइटिस) आणि सायनुसायटिसवरील आयूर्वेदीक उपचारात आघाडा ही वनस्पती वापरली जाते. याव्यतिरिक्त ताप , वेदना आणि सूज कमी करणे, तसेच संधिवात आणि मलेरियासारख्या आजारांवर उपचार करण्यासाठीही आघाडा ही प्रभावी वनस्पती आहे.

7.धोत्रा

धोत्रा या वनस्पतीला आयूर्वेदा बरोबरच हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. आयुर्वेदात विषारी पण अल्प प्रमाणात वापरल्यास रोग बरे करणारी ही वनस्पती मानली जाते. धोत्र्याच्या पानांचा आणि फुलांचा उपयोग वेदनाशामक, खोकला, दमा यांसारख्या रोगांवर केला जातो. धोत्र्याची फुले लक्ष वेधून घेणारी असतात.

8.जाई

जाई हे वेलवर्गीय कुळातील असून फूले अत्यंत सुगंधी असतात. जळजळ, जखमा, तोंडाच्या पोकळीतील आजार, डोकेदुखी आणि विषबाधा यांवर उपचार करण्यासाठी जाईचा वापर केला जातो. या वनस्पतीचे जवळपास सर्व भाग औषधी गुणधर्मांनी युक्त असतात आणि त्यांचा उपयोग विविध औषधे तयार करण्यासाठी होतो. फुलांचा वापर सुगंधी उत्पादने ,परफ्यूम आणि धूप बनवण्यासाठी होतो, तर पानांमध्ये पूतिरोधी आणि स्तम्भक (जखम थांबवणारे) गुणधर्म असतात.

9.जुई

जुई हे देखील वेलवर्गीय कुळातील असून फूले सुगंधी असतात. जळजळ, जखमा, तोंडाच्या पोकळीतील आजार, डोकेदुखी आणि विषबाधा यांवर उपचार करण्यासाठी वापर केला जातो. औषधी गुणधर्मांनी युक्त जुईचा उपयोग देखील विविध औषधे तयार करण्यासाठी होतो.

10.कांचन

कांचन वृक्षाचे विविध औषधी फायदे असून त्याची साल, पाने आणि फुले यांचा उपयोग मधुमेह, त्वचेचे आजार, आतड्यांतील कृमी आणि शरीरातील गाठींवर केला जातो. काचनार गुग्गुल या प्रसिद्ध आयुर्वेदिक औषधाचा कांचन हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.

11.तामण

तामण या झाडाची पाने, साल आणि फुले औषधी गुणधर्मांनी युक्त आहेत, यामध्ये रक्तातील साखर कमी करणे, अँटिऑक्सिडंट, दाहक-विरोधी आणि अँटी-कॅन्सर गुणधर्म समाविष्ट आहेत. याला ’बनाबा’ किंवा ’क्वीन्स फ्लॉवर’ असेही म्हणतात आणि ते महाराष्ट्राचे राज्यफूल म्हणून मान्यता प्राप्त आहे.

12.मरवा

मरवा ही एक सुगंधी औषधी वनस्पती असून तिच्या पानांचा आणि फुलांचा वापर पारंपारिक औषधांमध्ये होतो. मरवा श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, त्वचेचे आजार, हृदयरोग आणि मज्जातंतूंच्या समस्यांवर गुणकारी मानली जाते. तसेच, ती रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, यकृतासाठी टॉनिक म्हणून आणि मसाल्यामध्ये देखील वापरली जाते.

13.शेवगा

शेवगा ही सर्वदूर उपलब्ध असलेली बहुगुणी वनस्पती आहे. शेवग्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. त्याचे औषधी गुणधर्म हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारतात, रक्तातील साखर नियंत्रित करतात आणि दाह कमी करतात. शेवग्याची पाने, शेंगा आणि फुले यांचा वापर विविध रोगांवर उपचार करण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी पारंपरिक औषधांमध्ये होतो.शेवग्याच्या शेंगा, पाने आणि फूले यांचा वापर भाजीसाठी केला जातो.

14.भृंगराज

भृंगराज ही औषधी वनस्पती केस गळती थांबवण्यासाठी, केसांची वाढ सुधारण्यासाठी आणि केस अकाली पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी ओळखली जाते. हे केसांच्या तेलामध्ये, पावडरमध्ये किंवा इतर औषधीमध्ये वापरले जाते आणि यकृत टॉनिक म्हणूनही याला महत्त्व आहे. या वनस्पतीमध्ये फ्लेव्होनॉइड्स, सॅपोनिन्स, स्टिरॉइड्स आणि अल्कलॉइड्ससारखे विविध रासायनिक घटक असतात, ज्यामुळे त्याला औषधी गुणधर्म प्राप्त होतात.

15.केवडा

केवडा ही एक सुगंधी वनस्पती असून तिची फुले, पाने आणि मुळे औषधी गुणधर्मांची आहेत. आयुर्वेदिक औषधांमध्ये डोकेदुखी, संधिवात, पोटशूळ आणि त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी याचा वापर होतो. केवड्याच्या तेलामध्ये जीवाणूविरोधी गुणधर्म असून, ते शरीराला थंडावा देण्यास मदत करते.

16.करवीर

करवीर या वनस्पतीला कणेर या नावाने देखील ओळखले जाते. ही वनस्पती मुखावाटे सेवन करण्यास अंत्यत विषारी आहे, मात्र तीचावापर पारंपारिक औषधांमध्ये त्वचेचे विकार, अल्सर आणि कुष्ठरोग यांसारख्या अनेक आजारांवर केला जातो. मात्र त्याचा अत्यंत काळजीपूर्वक वापर आवश्यक आहे. ही वनस्पती शरीराची जळजळ कमी करण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे, पण ती विषारी असल्याने तिचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा.

17.बदाम

बदाम झाडाच्या पानांचे आणि फळांचे अनेक औषधी गुणधर्म आहेत, ज्यात अँटीऑक्सिडंट , दाहक-विरोधी , कर्करोग-विरोधी आणि मधुमेह-विरोधी गुणधर्म समाविष्ट आहेत. या झाडाचा उपयोग यकृत आणि आतड्यांसंबंधी संक्रमणांवर उपचार करण्यासाठी तसेच वातहारक आणि रेचक म्हणूनही केला जातो.

18.अर्जुन

अर्जुन या वृक्षाची साल हृदयाच्या आरोग्यासाठी, उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी वापरली जाते. अर्जुनमध्ये अँटिऑक्सिडंट्स, दाहक-विरोधी आणि प्रतिजैविक गुणधर्म आहेत, जे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

19.शिकाकाई

शिकाकशाई ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती असून ती प्रामुख्याने केसांच्या आरोग्यासाठी वापरली जाते. यात नैसर्गिक सॅपोनीन घटक असतात, जे त्वचेतील अतिरिक्त तेल व घाण काढून टाकण्यास मदत करतात, तसेच केस गळणे थांबवतात. शिकाकाईमुळे केस लांब, घनदाट आणि मऊ होतात, तसेच कोंडा आणि उवा कमी होण्यासही मदत मिळते.

20.वाळुंज

वाळुंज झाडाच्या सालीचा काढा सारक असून तो अश्मरीवर(मुतखडा) व मूत्रमार्गाच्या तक्रारींवर प्रभावी उपाय आहे. पानांचा रस पाय सुजणे, तळव्याची आग इत्यादींवर गुणकारी आहेत. वाळुंजाच्या सालीत सॅपोनीन हे द्रव्य असते. सालीच्या अर्काने तेलाचे दुग्धीकरण होते म्हणून ह्याच्या सालीचा उपयोग शरीरातील चरबी कमी करण्या साठी होतो. हा वनस्पती वायू, मुत्रघात, मुतखडा, गंडमाळ यावर उपयुक्त आहे.

21.चित्रक

चित्रक ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती असून तीचे मूळ आणि सालीचा उपयोग पचन सुधारण्यासाठी, चयापचय वाढवण्यासाठी, शरीर शुद्ध करण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी होतो. या वनस्पतीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी, अँटी-फंगल, अँटीऑक्सिडंट आणि वेदना कमी करणारे गुणधर्म आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT