श्रीवर्धन : एकीकडे वाढत्या उन्हामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन नगरपरिषदेकडून घंटागाडीद्वारे शहरात ‘सुका दुष्काळ आहे, पाणी जपून वापरा’ असे आवाहन केले जात आहे. मात्र, दुसरीकडे नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीतून लाखो लिटर शुद्ध पाणी वाया जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. रानवली धरणातून श्रीवर्धन शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी भोस्ते फाट्यावर पुन्हा एकदा फुटल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, याच ठिकाणी यापूर्वीही वारंवार जलवाहिनी फुटण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे हा केवळ तांत्रिक बिघाड नसून जलवाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीबाबत नगरपरिषद प्रशासन किती गंभीर आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याऐवजी तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याचा आरोपही होत आहे.
सध्या श्रीवर्धन शहरातील नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करणाऱ्या नगरपरिषद प्रशासनालाच स्वतःच्या जलवाहिनीतून होणारी पाण्याची नासाडी रोखता येत नसल्याचे चित्र आहे.
रानवली धरणातून प्रक्रिया करून शुद्ध केलेले पाणी शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच रस्त्यावर आणि गटारात वाहून जात आहे. एकीकडे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे लाखो लिटर पाण्याची अशी उधळपट्टी होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. जलसंकटाच्या काळात पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना, शुद्ध पाण्याची अशी उघडपणे होणारी नासाडी रोखणार कोण? असा संतप्त सवाल श्रीवर्धनकरांकडून उपस्थित केला जात आहे.
जनतेला उपदेश, मग प्रशासनाची जबाबदारी कोण घेणार?
नगरपरिषदेकडून पाणी बचतीचे आवाहन केले जात असताना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीची नियमित तपासणी आणि देखभाल का केली जात नाही? एकाच ठिकाणी वारंवार जलवाहिनी फुटत असेल तर त्या ठिकाणी कायमस्वरूपी दुरुस्ती का केली जात नाही? तसेच या पाणीगळतीमुळे होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी नेमकी कोणाची? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. संतप्त नागरिकांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली असून, प्रशासनाने तातडीने जलवाहिनीची दुरुस्ती करून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. केवळ नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन करून चालणार नाही, तर नगरपरिषदेनेही पाण्याची गळती रोखण्यासाठी तितकीच जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे.