श्रीवर्धन : भारत चोगले
डिजिटल युगात मोबाईल आणि इंटरनेट सेवा हे प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाले असताना श्रीवर्धन तालुक्यातील अनेक दुर्गम गावे अजूनही मोबाईल नेटवर्कच्या पलीकडे आहेत. परिणामी नागरिकांची वैयक्तिक कामे, शासकीय व्यवहार आणि शैक्षणिक उपक्रम प्रचंड अडचणीत येत आहेत.
तालुक्यातील बोरले, रसाळवाडी, देवखोल, नागलोली, धनगर मलई या गावांमध्ये मोबाईल नेटवर्क अत्यंत क्षीण आहे. इतकेच नव्हे तर अनेक वाड्यांमधील ग्रामस्थ आपल्या नातेवाईकांशी बोलण्यासाठी किंवा शहरात राहणार्या मुलांना फोन करण्यासाठी टेकडीवर चढावे लागते. तेव्हाच थोडेफार नेटवर्क मिळते.
या गावांमध्ये ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा, आरोग्य उपकेंद्रे आणि पोस्ट ऑफिसेस कार्यरत आहेत. मात्र, नेटवर्कअभावी दैनंदिन कामकाज ठप्प होते. नागलोलीतील पोस्ट ऑफिसला तर इंटरनेट जोडणी नसल्यामुळे व्यवहार करणे अवघड झाले आहे. ई-गव्हर्नन्सच्या काळात अशी स्थिती नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे.
धनगर मलई व देवखोल परिसरात भारत संचार निगमने मोबाईल टॉवर उभारले असले तरी ते कायमच बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे इडछङ चे सिम कार्ड नागरिकांसाठी निरुपयोगी ठरले असून पर्यायाने त्यांनी जिओ किंवा इतर खाजगी कंपन्यांची सेवा घेतली आहे. परंतु खाजगी कंपन्यांचे नेटवर्कही दुर्गम भागात समाधानकारक नाही.
ऑनलाईन शिक्षण, स्पर्धा परीक्षा अर्ज, शासकीय योजनांचे अर्ज, आधार व बँक व्यवहार, आरोग्य सेवा यासाठी इंटरनेट आवश्यक आहे. परंतु नेटवर्क नसल्यामुळे ग्रामीण भागातील युवक-युवतींना शहराकडे धाव घ्यावी लागते. यामुळे वेळ, पैसा आणि श्रम या तिन्हींचा अपव्यय होतो.
नागरिकांचे स्पष्ट मत आहे की, शासनाने या भागात कार्यरत टॉवर्स तातडीने सुरू करावेत. जर इडछङ कडून दुर्लक्ष झाले, तर खाजगी कंपन्यांना टॉवर उभारण्याची परवानगी द्यावी. अन्यथा शासनाच्या डिजिटल इंडिया संकल्पनेला ग्रामीण भागात मूळच नाही, असे चित्र निर्माण होईल.
ग्रामीण भागातील टॉवर्स कार्यरत ठेवणे ही शासनाची जबाबदारी आहे, खाजगी कंपन्यांना दुर्गम भागात टॉवर उभारण्यासाठी प्रोत्साहन व सवलती द्याव्यात, शाळा, ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र यांसाठी स्वतंत्र इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्यावी. श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारी असलेली गावे पर्यटनामुळे प्रकाशझोतात आली असली, तरी डोंगराळ भागातील नागरिक अजूनही नेटवर्कच्या अंधारात आहेत. शासनाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर गावकर्यांचा संयम सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.