भारत चोगले
श्रीवर्धन: कोकणातील निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि समुद्रकिनाऱ्यांची मोहिनी अनुभवण्यासाठी यंदाच्या सुट्ट्यांमध्ये हजारो पर्यटकांनी श्रीवर्धनकडे धाव घेतली. शनिवार-रविवारची सुट्टी आणि मे महिन्याच्या अखेरीस मिळालेल्या सलग सुट्ट्यांचा लाभ घेत पर्यटकांनी श्रीवर्धन अक्षरशः गजबजून टाकले. परिणामी शहरातील अनेक हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि होमस्टे “हाऊसफुल्ल“ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
पेशवेकालीन इतिहासाची साक्ष देणारे हे पर्यटनस्थळ आपल्या स्वच्छ, विस्तीर्ण आणि सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी दिसून आली. समुद्राच्या लाटांमध्ये खेळण्याचा आनंद, वाळूत आकर्षक किल्ले उभारणे, घोडागाडी आणि उंट सफारीचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांनी मोठी पसंती दर्शविली.
खाद्यप्रेमी पर्यटकांनीही कोकणातील पारंपरिक चवींचा मनमुराद आस्वाद घेतला. उकडीचे मोदक, सोलकढी, फणसाची भाजी, कोकणी थाळी यांसह पापलेट, सुरमई, बांगडा आणि कोळंबी यांसारख्या ताज्या समुद्री खाद्यपदार्थांना विशेष मागणी होती. अनेक हॉटेल्स आणि खानावळींमध्ये जेवणासाठी प्रतीक्षा करावी लागल्याचे चित्र दिसून आले.
दरम्यान, पर्यटनामुळे स्थानिक गृहउद्योगांनाही नवसंजीवनी मिळाली आहे. आंबा पोळी, फणस पोळी, कोकम सरबत, आवळा सरबत, आमसूल, करवंदे, जांभुळे आणि हापूस आंबा यांसारख्या कोकणी उत्पादनांच्या विक्रीत मोठी वाढ झाली. विशेषतः महिलांनी चालविलेल्या गृहउद्योगांना पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळत आहे.
समुद्र, इतिहास, निसर्ग आणि कोकणी संस्कृती यांचा सुंदर संगम लाभलेल्या श्रीवर्धनने पुन्हा एकदा पर्यटकांची मने जिंकली असून आगामी पावसाळी पर्यटन हंगामाकडेही पर्यटन व्यावसायिक आशावादी नजरेने पाहत आहेत.
व्यावसायिकांनाही मोठा लाभ
पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळाली आहे. अनेक रिसॉर्ट्स, लॉज आणि होमस्टे मालकांनी आठवडाभर आधीच सर्व खोल्यांचे आरक्षण पूर्ण झाल्याचे सांगितले. स्थानिक वाहनचालक, फेरीवाले, मार्गदर्शक आणि लघु व्यावसायिकांनाही या पर्यटन हंगामाचा मोठा लाभ मिळाला.