Shrivardhan Stamp Paper Issue Pudhari
रायगड

Shrivardhan Stamp Paper Issue: एकाच मुद्रांक विक्रेत्यामुळे श्रीवर्धनकर हैराण

कामांसाठी तासन्‌‍तास प्रतीक्षा, प्रशासन झोपेत? नागरिकांमधून तीव्र नाराजी; अतिरिक्त मुद्रांक विक्रेत्यांची तातडीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

भारत चोगले

श्रीवर्धन: श्रीवर्धनसारख्या तालुक्याच्या मुख्य ठिकाणी मुद्रांक (स्टॅम्प) विक्रीची अत्यंत मर्यादित व्यवस्था असल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र समोर येत आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसीलदार कार्यालय आवार येथे नरेश दामोदर गंबर हे एकमेव अधिकृत मुद्रांक विक्रेते कार्यरत आहेत. मात्र, संपूर्ण तालुक्याचा भार एकाच विक्रेत्यावर असल्याने नागरिकांना तासन्‌‍‍तास रांगा लावाव्या लागत आहेत.

श्रीवर्धन तालुक्यातील सुमारे 42 गावांतील नागरिक विविध शासकीय कामांसाठी जसे की उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, निवासी दाखला, शैक्षणिक कागदपत्रे, करारनामे, प्रतिज्ञापत्रे, तसेच मालमत्ता व्यवहार यासाठी नियमितपणे स्टॅम्प पेपरची आवश्यकता भासते.

सध्या दहावी व बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना विविध प्रवेश प्रक्रियांसाठी तातडीने कागदपत्रांची पूर्तता करावी लागत आहे. अशा वेळी मुद्रांक उपलब्धतेतील अडथळे अधिकच गंभीर ठरत आहेत.

एकाच मुद्रांक विक्रेत्यावर संपूर्ण तालुक्याचा भार आल्याने प्रचंड गर्दी होत असून, अनेकदा नागरिकांना दिवसभर प्रतीक्षा करूनही स्टॅम्प मिळत नाहीत, अशी तक्रार समोर येत आहे. त्यामुळे वेळेचा अपव्यय तर होतोच, पण प्रवास खर्च, दैनंदिन कामांमध्ये होणारा विलंब आणि मानसिक तणावही वाढत आहे.

मुद्रांक विक्री ही राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या नियंत्रणाखालील महत्त्वाची सेवा असून नागरिकांना वेळेवर आणि सुलभपणे स्टॅम्प उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, श्रीवर्धनमध्ये या सेवेत स्पष्टपणे तुटवडा जाणवत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

श्रीवर्धनमध्ये तातडीने अतिरिक्त मुद्रांक विक्रेत्यांना परवाने देण्यात यावेत. गर्दीच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र काउंटर किंवा डिजिटल पर्याय सुरू करावेत. सेवा वेळ वाढवून नागरिकांना दिलासा द्यावा जर सध्याची व्यवस्था नागरिकांना समाधानकारक सेवा देण्यात अपयशी ठरत असेल, तर संबंधित मुद्रांक विक्रेत्याचा परवाना रद्द करण्याची मागणीही जोर धरत आहे.

एकाच मुद्रांक विक्रेत्यावर अवलंबून राहण्याची वेळ का यावी, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन योग्य उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात हा प्रश्न अधिकच तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेवटी, नागरिकांच्या मूलभूत शासकीय सेवांमध्ये अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी प्रशासनाने आता तरी जागे होणे गरजेचे आहे अन्यथा जनतेचा रोष वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

सेवा न देणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करणे

श्रीवर्धनमध्ये मुद्रांक विक्रेत्यांची कमतरता नागरिकांसाठी गंभीर समस्या ठरत आहे. परवाना असूनही सेवा न देणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे. नियमांनुसार अशा निष्क्रिय परवानाधारकांचे लायसन्स रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नवीन मुद्रांक विक्रेत्यांना परवाने देणे गरजेचे आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून ठोस निर्णय घ्यावा, अशी जनतेची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT