श्रीवर्धन ः आनंद जोशी
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे श्री सोमजाई देवीचे जागृत देवस्थान आहे. देवी सोमजाई अशी अर्धनारी नटेश्वर स्वरुपी असून येथे भाविकांच्या अनंत इच्छा पूर्ण होतात, असे हे नवसाला पावणारे जागृत देवस्थान आहे. विशेष महत्त्वपूर्ण म्हणजे श्री सोमजाई देवी भवानी तीर्थ व श्री हरिहरेश्वर शिवतीर्थ श्री काळभैरवांसह या दोन्ही क्षेत्रांचे एकाच दिवशी भक्ती श्रद्धापूर्वक दर्शन घेतल्याने श्री क्षेत्र दक्षिण काशीचे तीर्थ पूर्ण केल्याचे पुण्य भाविकांचे पदरी पडते व जीवनातील विविध अडचणींचा परिहार होतो.
श्री सोमजाई देवी देवस्थान क्षेत्र सध्या ज्या ठिकाणी स्थापित आहे तेथे पूर्वी बेल, पिंपळ, वड अशा वृक्षवेलींचे अति घनदाट जंगल होते.त्या जवळील जागेत लहान मुले विविध प्रकारचे खेळ खेळत असत. या खेळणार्या मुलांमधून एक लहान मुलगा व मुलगी जंगलाचे दिशेने जात असता, ती कोणाची मुले असावीत या जिज्ञासेपोटी गावकर्यांनी या गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवले असता दोन्हीही लहान मुले जंगलातील पिंपळ वृक्षाजवळ अदृश्य झाली. या व्यतिरिक्त इतर काहीही माहिती हाती लागू शकली नाही व तेव्हापासून ती लहान मुले परत गावकरी मंडळींच्या दृष्टीस पडली नाहीत.
या पार्श्वभूमीवर महामुनी अगस्ती तीर्थाटन करीत श्रीवर्धन ग्रामी आले. तेव्हा गावकरी मंडळींनी मुले अदृश्य झाल्याचा वृत्तांत श्री अगस्ती मुनींसमोर कथन केला. तेव्हा महातपस्वी श्री महामुनी अगस्ती यांनी अलौकिक सामर्थ्याच्या बळावर जंगलाची पाहणी केली. तेव्हा त्यांच्या तपोबलाने स्वयंभू भीमाशंकर असे अर्धनारी नटेश्वराचे अस्तित्व पिंपळ वृक्षाखाली असल्याची जाणीव झाली. तेव्हा त्यांनी आपल्या तपोबलाच्या सामर्थ्याने होम-हवन, आवाहन करुन भगवंतांना प्रगट होण्याविषयी प्रार्थना केली. त्या समयी पिंपळ वृक्षाचे बुंध्याजवळ अग्निलोळ प्रगट झाला. त्यावेळी भूगर्भातून शिवभवानी दिव्य शालिग्राम रुपांत प्रगट झाली. आजही सदरचा शालिग्राम श्रींचे मंदिरात पूजेकरिता अस्तित्वात आहे.
तद्नंतर अगस्ती महामुनींनी, भगवंतांनी श्रीवर्धन ग्रामी जनकल्याणासाठी स्थापित व्हावे अशी प्रार्थना करुन सदर पिंपळ वृक्षाचे खाली आता ज्या ठिकाणी श्रींचे मंदिर आहे तेथे श्री सोमजाई देवी या नावाने सदर शालिग्राम रुपी अर्धनारी नटेश्वराची स्थापना केली. सद्यस्थितीत सदर देवस्थानचे चतु:सीमेस पूर्वी स्थापन केलेल्या शिवशक्ती कंकाळी, भद्रकाली, कात्यायनी व चामुंडा या चारही देवता आजही स्थापित आहेत व मुख्य देवता श्री सोमजाई देवी शिवभवानी, नंदी व वासुकी या चार शक्ती शालिग्राम रुपांतर मंदिरांत प्रसिद्ध आहेत.
श्री सोमजाई देवी मंदिरात महामुनी श्री सप्तश्रृंगी ऋषी यांनी वासुकी यज्ञ केलेला आहे. आजही कोणत्याही प्राणिमात्रास सर्प विषबाधा झाली असता जहाल सर्प विष श्री सोमजाई देवीचे सान्निध्यात पूर्ण उतरले जाते. अशी श्री सोमजाई देवी श्रीवर्धन पंचक्रोशीतील घनदाट जंगल वस्तींतील लोकांना सर्प वर्षापासून जीवदान देणारी देवता जीवनदायिनी म्हणून सहाय्यभूत आहे. तसेच श्रींचे अभ्यंगस्नानाचे तीर्थ प्राशन केल्याने अनेक चर्म रोग बरे होतात.
आजही असंख्य भाविक ठिकठिकाणाहून येऊन श्रद्धापूर्वक व्रतस्थ राहून श्रींचे तीर्थ प्राशनाने चर्मरोग व्याधींपासून मुक्ती मिळवीत आहेत. हा आजचे विज्ञान युगातील सर्वात मोठा श्रींचा दैवी चमत्कार श्रीवर्धन क्षेत्री अनुभवास मिळत आहे. तसेच श्री सोमजाई क्षेत्री कौल लावण्याची प्रथा आजतागायत सुरु आहे. असंख्य भाविक वैयक्तिक प्रश्न व संकट निवारणार्थ कौल लावण्याकरिता श्री क्षेत्री उपस्थित राहतात. आपले पुत्रप्राप्ती, संकट निवारक, नोकरीविषयक विविध इच्छापूर्ती नवस श्री सोमजाई देवीच्या मंदिरात येऊन श्रद्धापूर्वक फेडीत असतात.
श्री सोमजाई देवी देवस्थानचा प्रमुख उत्सव हा ’सप्ताह उत्सव’ म्हणून मार्गशीर्ष महिन्यात साजरा करण्यात येतो. पूर्वी गावांत साथीच्या रोगांचा फैलाव होऊन गावचे गाव ओस पडत असत. अशा प्रकारे प्लेगची साथ श्रीवर्धन गावात आली असता शालिवाहन शके 1799 मध्ये श्री सोमजाई देवी चरणी गावाचे प्लेगपासून रक्षण होण्याकरिता श्रींचा सप्ताह उत्सव साजरा करण्याचा नवस करण्यात आला होता. सप्ताह उत्सव सोहळ्यास मार्गशीर्ष वद्य प्रतिपदेस श्रींची स्थापना करुन प्रारंभ होतो. सात दिवस व रात्र जागर भजनाचा कार्यक्रम सुरु असतो. आठव्या दिवशी दहीकाला व महाप्रसाद होतो व रात्रौ 12 वाजता श्रींच्या रथोत्सव सोहळ्यास प्रारंभ होतो.
श्रीवर्धन कसबे मजकूर भागांत रथयात्रा फिरुन नवव्या दिवशी स. 11 वा.श्रींच्या रथोत्सव सोहळ्याची सांगता होते. रथ उत्सवाचे वेळी भाविक नवस फेडण्यासाठी उपस्थित असतात. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजया दशमी कालावधीमध्ये शारदीय नवरात्रोत्सव श्री सोमजाई देवी मंदिरात साजरा करण्यात येतो. तसेच श्रीवर्धन येथील वनदेवी श्री कुसुमादेवी देवस्थानचे जत्रेकरिता चैत्र शुद्ध तृतीया चैत्रगौरी व श्री भैरवनाथ यात्रेकरिता पौर्णिमा या दोन्ही वेळी श्रींची पालखी जात असते.