Shrivardhan Rice Farming Loss Pudhari
रायगड

Shrivardhan Rice Farming Loss: श्रीवर्धनमधील भातशेती संकटात! पावसाचा दुहेरी फटका; प्रशासनाच्या मदतीची प्रतीक्षा

अचानक पावसाने दडी मारल्यामुळे उरलेली पिकेही धोक्यात आली असून शेतकरी पुन्हा एकदा चिंतेच्या गर्तेत सापडला आहे.

पुढारी वृत्तसेवा

श्रीवर्धन: श्रीवर्धन तालुक्यात यंदाच्या पावसाळ्याने शेतकऱ्यांची मोठी निराशा केली आहे. सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

शेतांमध्ये पाणी साचल्याने भाताची रोपे कुजली, तर काही भागात माती वाहून गेल्याने पिकांचे गंभीर नुकसान झाले. त्यानंतर अचानक पावसाने दडी मारल्यामुळे उरलेली पिकेही धोक्यात आली असून शेतकरी पुन्हा एकदा चिंतेच्या गर्तेत सापडला आहे.

विशेष म्हणजे, हवामान खात्याने काही महिन्यांपूर्वीच यंदाचा पाऊस कमी आणि सातत्यपूर्ण नसण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

अशा परिस्थितीत कृषी विभाग आणि संबंधित प्रशासनाने शेतकऱ्यांसाठी पर्यायी नियोजन, मार्गदर्शन, बियाणे उपलब्धता, जलव्यवस्थापन किंवा अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या गेल्याचे चित्र दिसून आले नाही, अशी नाराजी शेतकरी व्यक्त करत आहेत.

मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून करण्यात आले असले, तरी अद्याप नुकसानभरपाई, पुनर्लागवडीसाठी मदत किंवा अन्य ठोस निर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे पंचनामे करूनही प्रत्यक्ष दिलासा मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे.

एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती धोक्यात आली आहे, तर दुसरीकडे प्रशासनाकडून वेळेवर ठोस उपाययोजना न झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक संकट अधिकच गडद होत आहे. उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान भरून काढणे शेतकऱ्यांसाठी अशक्य बनले आहे.

या परिस्थितीमुळे श्रीवर्धन तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT