

पनवेल: नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तळोजा येथील धरणा गांव येथे सुगंधी पानमसाला आणि गुटख्याची बेकायदेशीर बाहतूक व साठवणूक करणाऱ्या मोठ्या आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश केला. तळोजा परिसरात केलेल्या या कारवाईत १ कोटी ५ लाख ६३ हजारांचा बेकायदा गुटखा साठा जप्त केला. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
तळोजा येथील धरणा गांव येथे सुगंधी पानमसाला आणि गुटख्याचा साठा नवी मुंबई, मुंबई परिसरात वितरीत करण्यासाठी आणण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.
या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट 1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेशकुमार महाडीक, पोलीस उपनिरीक्षक प्रदिप जोरुडे आणि त्यांच्या पथकाने तळोजा येथील धरणा गांव येथील नाटली कंपाऊंडमध्ये छापा टाकला. यावेळी या ठिकाणी मोठ्या आयशर टेम्पोमधून २ मारुती सुझुकी सुपर कॅरी टेम्पोमध्ये गुटख्याचा साठा भरण्याचे (लोडिंग-अनलोडिंग) काम सुरु असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी पोलिसांनी या ठिकाणावरुन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला ४८ लाख ६० हजार रुपये किंमतीचा प्रिमीयम राजनिवास सुगंधित पान मसाला आणि प्रिमीअम झेड एन-१ जाफराणी जर्दा तसेच २० लाख रुपये किंमतीचा आयशर प्रो टेम्पो, प्रत्येकी १० लाख रुपये किंमतीचे २ मारुती सुझुकी सुपर कॅरी टेम्पो जप्त केले. येथे करण राम साळुंखे, दर्शन उर्फ जग्गू ओमप्रकाश कुमार आणि विनोदकुमार प्रभुराम प्रजापती या तिघांना अटक केली.
तिघांची कसून चौकशी
त्यानंतर पोलिसांनी तिघांची कसून चौकशी केली असता, करण साळुंखे याने तळोजा घोट कॅम्प येथील निलकमल रेसीडेन्सीतील गाळ्यामध्ये गुटख्याचा साठा लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घोट कॅम्प येथील गाळा नं-२ मधून तब्बल १६लाख रुपये किंमतीचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधी पानमसाला आणि गुटख्याचा साठा जप्त केला.
अशा प्रकारे गुन्हे शाखेने या कारवाईत एकूण १ कोटी ५लाख ६३हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुह्यात अटक करण्यात आलेला आरोपी करण साळुंखे गुटख्याचा मोठा सप्लायर असून त्याच्यावर यापूर्वी ५ गुन्हे दाखल आहेत. तो नवी मुंबईच्या बेलापूर ते ऐरोली या पट्ट्यात गुटखा सल्पाय करत होता. त्यानंतर त्याने आता पनवेल तळोजा पट्ट्यामध्ये आपला धंदा सुरु केल्याचे या कारवाईवरुन दिसून येत आहे.