श्रीवर्धन : भारत चोगले
कोकणातील शांत समुद्रकिनारे, समृद्ध इतिहास आणि निसर्गरम्य सौंदर्य यासाठी ओळखले जाणारे श्रीवर्धन आज पर्यटनाच्या नकाशावर वेगाने उदयास येत आहे. शहराला मिळालेला ‘ब’ दर्जाचा पर्यटन मानांकन हा मोठा टप्पा मानला जात असला, तरी सुसज्ज वाहनतळाच्या अभावामुळे शहराची वाहतूक व्यवस्थाच अस्ताव्यस्त होत चालली आहे.
दरवर्षी महाराष्ट्रासह देशभरातून हजारो पर्यटक श्रीवर्धनकडे आकर्षित होत आहेत. स्थानिक नागरिकांनी रिसॉर्ट, होमस्टे, लॉज, खानावळ आदी व्यवसाय उभारून पर्यटनाला नवे बळ दिले आहे. मात्र बहुतांश पर्यटन व्यवसायांमध्ये स्वतंत्र पार्किंगची सोय नसल्याने पर्यटकांना मुख्य रस्त्यांवरच वाहने उभी करावी लागत आहेत.यामुळे अरुंद रस्त्यांवर वाहतुकीची साखळी खंडित होत, शहरात दिवसभर कोंडीचे चित्र दिसते.
नगर परिषद पर्यटकांकडून पर्यावरण नियंत्रण कर व स्वच्छता उपविधी कर आकारते; तरीही शहराच्या मध्यवर्ती भागात कोणतेही सुसज्ज वाहनतळ नसणे ही मोठी पोकळी ठरत आहे. उपलब्ध जागेचा अयोग्य वापर, अव्यवस्थित पार्किंग आणि नियोजनाचा अभाव हे प्रश्न अधिक गंभीर बनवत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या मते, श्रीवर्धनला पर्यटन, इतिहास आणि विज्ञान यांची त्रिसूत्री लाभली असली तरी त्याला पूरक अशी आधुनिक, बहुमजली वाहनतळाची उभारणी तातडीची आहे.शहराच्या भविष्यातील नियोजनासाठी हा निर्णय निर्णायक ठरणार आहे.
महत्त्वाचे प्रकल्प उभे राहणार
आगामी काळात श्रीवर्धनमध्ये श्रीमंत पेशवे स्मारक, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, शिवसृष्टी, तसेच प्लॅनेटेरियम हे महत्त्वाचे प्रकल्प उभे राहणार आहेत. या प्रकल्पांमुळे देश-विदेशातून पर्यटनाची मोठी वाढ अपेक्षित आहे. पर्यटन वाढेल, पण त्यासाठीची वाहतूक आणि पार्किंग व्यवस्था सुधारली नाही तर संपूर्ण शहराला याचे चटके बसू शकतात.