भारत चोगले
श्रीवर्धन : श्रीवर्धन-म्हसळा दरम्यानचा सुमारे 16 किलोमीटरचा रस्ता निसर्गरम्य असला, तरी त्यातील जवळपास 11 किलोमीटरचा घाटमार्ग आता अपघातांचे केंद्रबिंदू बनला आहे. या घाटातील ‘बोडणी डाग’ हा भाग विशेषतः धोकादायक ठरत असून, गेल्या एका वर्षात येथे पाच भीषण अपघात घडल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या मार्गावर तीव्र उतार, अरुंद आणि वळणदार रस्ते यामुळे वाहन चालवणे अत्यंत कौशल्याचे काम आहे. मात्र, अनेक चालक रस्त्याची स्थिती आणि घाटाचे स्वरूप लक्षात न घेता बेफिकिरीने वाहन चालवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
उतारावर इंधन बचतीसाठी वाहन न्यूट्रल गिअरमध्ये चालवण्याचा धोकादायक प्रयोग अनेक चालक करत असल्याने अपघातांचा धोका अधिक वाढतो. अशावेळी वाहनाचा वेग अनियंत्रित होऊन सतत ब्रेक दाबावे लागतात, परिणामी ब्रेक डिस्क गरम होऊन ब्रेक निकामी होण्याच्या घटना घडतात.
वाढत्या पर्यटनामुळे श्रीवर्धनकडे पर्यटकांची मोठी वर्दळ वाढली आहे. त्यातच तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे ट्रेलर, मायनिंग डंपर आणि जड वाहने मोठ्या प्रमाणात या घाटातून जात आहेत. या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणजे बोडणी डाग हा भाग ‘अपघात प्रवण क्षेत्र’ म्हणून कुप्रसिद्ध झाला आहे.
अपघातांनी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये संताप व भीती निर्माण केली आहे. नागरिकांच्या मते, प्रशासनाने या ठिकाणी तातडीने वेग मर्यादा फलक, धोकादायक वळणांची सूचना, रंबल स्ट्रिप्स, तसेच पोलिस गस्त वाढवणे अत्यावश्यक आहे.
“रस्ता सुंदर असला तरी सुरक्षितता अधिक महत्त्वाची,” अशी प्रतिक्रिया व्यक्त करत नागरिकांनी प्रशासनाला त्वरित उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा, बोडणी डाग हा भाग भविष्यात आणखी भीषण अपघातांचा साक्षीदार ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गेल्या वर्षातील धक्कादायक अपघातांची मालिका :
सिमेंट ब्लॉक वाहून नेणारा ट्रेलर पलटी; चालक जखमी.
स्टील साहित्य घेऊन येणाऱ्या ट्रेलरचे ब्रेक निकामी; झाडावर धडकून वाहन जळाले.
गॅस सिलेंडर ट्रकचा अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली.
मायनिंग ट्रक खोल दरीत कोसळला; चालक व क्लिनर जखमी.
बागमांडला खाडी पुलाकडे जाणारा ट्रेलर पिकअप टेम्पोवर पलटी; चालक जागीच ठार, पाच जण जखमी.
मार्गावर वाहतुकीच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत संरक्षक भिंत व कॅश बॅरियरची प्रभावी उपाययोजना करण्यात आली आहे.वळणांच्या ठिकाणी रस्ता पुरेशा रुंदीचा ठेवण्यात आल्यामुळे वाहनचालकांना कोणताही अडथळा निर्माण होत नाही.रस्त्याचा उतारही नियमांनुसार मर्यादित असून तो धोकादायक स्वरूपाचा नाही.संपूर्ण मार्गाची रचना तांत्रिक निकषांचा विचार करून सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आली आहे.त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक सुरळीत व सुरक्षितपणे पार पडत आहे.- तुषार लुंगे, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग,