श्रीवर्धन : भारत चोगले
श्रीवर्धन नगरपरिषद निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेले नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अखेर जाहीर झाले आहे. ते ओबीसी सर्वसाधारण या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या घोषणेनंतर स्थानिक राजकीय वर्तुळात अक्षरशः खळबळ उडाली आहे. काही दिवसांपासून हे पद अनुसूचित जातींसाठी जाणार अशी जोरदार चर्चा होती; मात्र अखेरच्या निर्णयाने सर्व तर्क-वितर्कांना पूर्णविराम मिळाला असून, आता श्रीवर्धनचे राजकारण नव्या समीकरणांकडे वळताना दिसत आहे.
आरक्षण जाहीर होताच एकाच पक्षातील तब्बल पाच ते सहा उमेदवारांची नावे जोरात चर्चेत आली आहेत. या सर्वांनी आपल्या गोटात हालचाली सुरू केल्या असून, गाठीभेटी, चर्चासत्रे, गुप्त बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे. त्यामुळे यावेळी नगराध्यक्षपदाची निवडणूक खर्या अर्थाने रंगतदार आणि उत्कंठावर्धक होणार असल्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
ओबीसी आरक्षणामुळे राजकीय वातावरणात नवा उत्साह निर्माण झाला आहे. काही जणांना ही सुवर्णसंधी वाटत असताना, काही इच्छुकांची स्वप्ने धुळीस मिळाली आहेत. त्यातून पक्षांतर्गत अंतर्गत स्पर्धा आणि गटबाजी अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेला प्रश्न म्हणजे कोण पक्षात राहणार, आणि कोण देणार सोडचिठ्ठी? पक्षीय समतोल राखत उमेदवारांची निवड ही पक्षांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. काही अनुभवी आणि प्रभावशाली नेत्यांची नावे पुढे येत असताना, काही नवोदित कार्यकर्तेही या स्पर्धेत आपले स्थान निर्माण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. सध्या तालुक्यातील प्रत्येक गल्लीपासून ते राजकीय कार्यालयापर्यंत एकच चर्चा या वेळी श्रीवर्धनच्या नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्सुकता लागली आहे. राजकीय तापमान चढत असून, पुढील काही दिवसांत रंगतदार घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकाच पक्षातील पाच ते सहा उमेदवारांची नावे जोरात चर्चेत आली आहेत. या सर्वांनी आपापली मोर्चे बांधणी सुरू केल असून, गाठीभेटी, चर्चासत्रे, गुप्त बैठकांना वेग आला आहे. त्यामुळे यावेळी नगराध्यक्षपदाची निवडणूक रंगतदार आणि उत्कंठावर्धक होणार असल्याचे दिसून येत आहे. मागील निवडणूकीत श्रीवर्धनमध्ये एकत्रीत सत्त्ता मिळविली होती.मात्र आता पक्षपूटी झाली असली तरीही खा.तटकरे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पून्हा सत्ता मिळवणार का हे पहावे लागणाक्षर आहे.
समाजाधारित राजकारण
पूर्वीपासून श्रीवर्धनचे नगरराजकारण समाजाधारित गणितांवर अवलंबून राहिले आहे ज्याचा समाज जास्त, त्यालाच नगराध्यक्षपदाची माळ हे सूत्र येथे नेहमीच लागू पडले आहे. पण या वेळी परिस्थिती वेगळी आहे. ओबीसी सर्वसाधारण आरक्षणामुळे समीकरणे गुंतागुंतीची झाली असून, प्रत्येक पक्षाचे गणित नव्याने मांडले जात आहे.