

पालघर : पालघर जिल्ह्यातील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा एका व्यक्तीसोबत जबरदस्तीने विवाह केल्याचा प्रकार घडला असून या प्रकारात लैंगिक अत्याचार केल्याचा आणि गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली.
पीडित मुलीच्या तक्रारीनुसार या वर्षाच्या सुरुवातीला आरोपींपैकी एकजण आणखी एका व्यक्तीसह पालघरमधील जव्हार तालुक्यात तिच्या घरी आला होता आणि त्यांनी त्या व्यक्तीसोबत मुलीच्या विवाहाचा प्रस्ताव मांडला. त्या व्यक्तीने 10 एप्रिल रोजी मुलीसोबत लग्न केले आणि तिच्या पालकांना 85 हजार रुपये दिले. त्यानंतर तो तिला जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे घेऊन गेला.
पीडितेच्या आरोपानुसार त्या व्यक्तीने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. यामुळे ती गर्भवती झाली. त्यानंतर त्या व्यक्तीच्या आईने तिला काही गोळ्या दिल्या आणि त्यामुळे तिचा गर्भपात झाला. त्या व्यक्तीने आणि त्याच्या कुटुंबाने तिचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू हिसकावून घेतल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. यानंतर ती जव्हार येथील आपल्या पालकांच्या घरी परतली. दरम्यान, या मुलीने नुकताच श्रमजीवी संघटना या आदिवासी कल्याण संस्थेशी संपर्क साधला.
त्यांनी तिला पोलिसांत तक्रार दाखल करण्यास मदत केली. या तक्रारीवरून सोमवारी रात्री नवरदेव, त्याचे आई-वडील आणि इतर तीन व्यक्ती अशा 6जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता, लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायदा आणि बालविवाह प्रतिबंध कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे अधिकार्यांनी सांगितले. दरम्यान, जव्हार पोलिस ठाण्यातील अधिकार्यांनी सांगितले की, गुन्ह्याचा तपास सुरू असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.